घरमुंबईभरती प्रक्रियेकडे डॉक्टरांची पाठ

भरती प्रक्रियेकडे डॉक्टरांची पाठ

Subscribe

चार दिवसांत 1600 पैकी फक्त 391 जण मुलाखतीला हजर

राज्यातील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने 23 जुलैपासून आरोग्य भवन येथे भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी राज्यातील तब्बल 1600 पदव्युत्तर पदवीधारकांना मुलाखतीसाठी पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र 1600 मधील फक्त 391 डॉक्टर चार दिवसांमध्ये मुलाखतीला हजर राहिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या भरतीकडे राज्यातील डॉक्टरांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.

भरती प्रक्रियेला डॉक्टरांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे आरोग्य विभागाने भरती प्रक्रियेच्या मुलाखतीची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने राज्यभरात 870 डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ या संवर्गातील ‘वैद्यकीय अधिकारी गट अ’ यांच्या रिक्त असलेल्या पदांच्या भरतीसाठी 23 ते 26 जुलैदरम्यान मुलाखत प्रक्रिया राबवण्यात आली.

- Advertisement -

या मुलाखतीसाठी राज्यभरातील 1600 डॉक्टरांना आरोग्य विभागाकडून मुलाखत पत्र पाठवण्यात आले होते. चार दिवस असलेल्या या मुलाखत प्रक्रियेसाठी दररोज 400 डॉक्टरांना मुलाखतीसाठी आरोग्य विभागाकडून बोलावण्यात आले होते. मात्र चार दिवस चाललेल्या मुलाखतीसाठी राज्यभरातून 1600 पैकी अवघे 391 डॉक्टरांनीच उपस्थिती लावली. मुलाखतीला उपस्थित राहिलेल्या डॉक्टरांची मुलाखत त्यांच्या एमबीबीएसचे गुण व त्यांचा असलेला अनुभव लक्षात घेऊन त्यांची निवड करत त्यांना लगेचच नियुक्तीपत्रही आरोग्य विभागाकडून देण्यात आले. मात्र 1600 डॉक्टरांपैकी फक्त 391 डॉक्टरच मुलाखतीला आल्याने राज्यातील डॉक्टरांनी आरोग्य विभागाच्या भरतीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून आले. राज्यात 870 डॉक्टरांची पदभरती करायची असून, फक्त 391 डॉक्टरांनीच मुलाखतीसाठी उपस्थिती लावल्याने उर्वरित जागा कशा भरायचा असा प्रश्न आरोग्य विभागासमोर निर्माण झाला आहे. तसेच सरकारी नोकरीकडे डॉक्टरांकडून पाठ फिरवण्यात येत असल्याने राज्य सरकारकडून डॉक्टरांना देण्यात येत असलेले वेतन व अन्य सोयीसुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारकडून डॉक्टरांना पुरवण्यात येणार्‍या सोयीसुविधा या फारच अल्प असल्यामुळे आरोग्य विभागाच्या पदभरतीकडे डॉक्टरांनी पाठ फिरवली असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुलाखत प्रक्रियेला मुदतवाढ
मुलाखतीकडे डॉक्टरांनी पाठ फिरवल्याने आरोग्य विभागाकडून अधिकाधिक डॉक्टरांनी मुलाखतीला यावे यासाठी मुलाखतीची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील दिवसांमध्ये किती डॉक्टर मुलाखतीसाठी येतात हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.

- Advertisement -

राज्यभरातून 1600 डॉक्टरांना आम्ही मुलाखतीसाठी बोलावले आहे. त्यातील आतापर्यंत 300 च्या आसपास डॉक्टर मुलाखतीसाठी उपस्थित राहिले आहेत. तसेच मुलाखतीसाठी आम्ही मुदतवाढ दिली आहे.
– एल.बी. भरोसे, अवरसचिव, आरोग्य विभाग

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -