डोंबिवलीत रिक्षाचालकाचे अपहरण करून जबर मारहाण

Mumbai

रिक्षाचालकाचे अपहरण करून जीवघेणी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. बाबासाहेब कांबळे असे मारहाण झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी भाजपच्या रिक्षा युनियनच्या पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेच्या शेलार नाका परिसरात बाबासाहेब कांबळे राहतात. शनिवारी रात्री त्यांना काही जणांनी जानकी हॉटेल परिसरातून रिक्षात उचलून नेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाली. त्यामुळे त्यांचा भाऊ सिद्धार्थ याने घटनास्थळी धाव घेतली असता त्याचा भाऊ बाबासाहेब कांबळे हा रक्तबंबाळ अवस्थेत शेलार नाक्यावर पडलेला आढळून आला. भाजपच्या रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर, रवी माळेकर आणि त्याच्या 5 ते 6 साथीदारांनी आपल्याला अपहरण करून उचलून नेले आणि अज्ञात स्थळी नेऊन रॉड, वायरने मारहाण केल्याची माहिती कांबळेंनी दिली.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा भाजपच्या रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर, रवी माळेकर आणि इतर 5 ते 6 जणांच्या विरोधात अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.