घरमुंबईडोंबिवलीतील ज्वेलर्सकडून कोटींना गंडा !

डोंबिवलीतील ज्वेलर्सकडून कोटींना गंडा !

Subscribe

ज्वेलर्स मालक घर दुकान विकून फरार

सोन्याच्या बदल्यात जादा सोने आणि पैशांवर बँकेपेक्षा अधिक व्याज असे आमिष दाखवून डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजितकुमार कोठारी याने सर्वसामान्यांची सुमारे 2 कोटी 67 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा आकडा 8 ते 9 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तर याही पुढे ही फसवणूक 15 कोटी रुपयांपर्यंतची असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे नेमका आकडा अजूनही स्पष्ट झालेला नाही. त्याने हा पैसा दुबई, राजस्थान आणि ठाणे जिल्ह्यातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याची माहिती पोलीस तपासात उजेडात आली आहे. तसेच ज्वेलर्स मालक हा दुकान आणि घर विकून फरार झाल्याने त्याला पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवरील प्रथमेश ज्वेलर्सचे मालक अजितकुमार कोठारी यांनी सर्वसामान्यांनासाठी एक स्कीम राबवली होती. जितके तोळे सोने गुंतवणूक कराल त्या बदल्यात वर्षाला 1 तोळे जादा सोने आणि पैशाची गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षाही अधिक 14 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी सोने आणि पैशाची गुंतवणूक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत अनेकांना पैसे व सोने न मिळाल्याने ग्राहकांनी त्याच्या दुकानासमोर एकच गराडा केला होता.

- Advertisement -

त्यातूनच ज्वेलर्सचे हे बिंग फुटले. त्यानंतर ज्वेलर्स मालक अजितकुमार दुकानाला टाळं ठोकून फरार झाला आहे. ऐन दिवाळीत सोने व पैसे न मिळाल्याने 8 तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी त्याच्या दुकानावर फलक लावून कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्यासाठी डोंबिवली पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. असे आवाहन केले आहे. अजितकुमार याने हा पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतविल्याची माहिती उजेडात आली असून पोलीस तपास सुरू आहे. तसेच त्याचे बँक खाती पतपेढी आदी सर्व खाती तपासण्यात येणार असल्याचेही रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी सांगितले. अजितकुमार याने दुकानही विकले असून तीन महिन्यांपासूनच तो दुकान विकण्याच्या तयारीत होता. राजस्थान, पडले गाव, दावडी,कल्याण, आजदे, अंबरनाथ आणि दुबई आदी शहरांमध्ये साईट चालू आहेत.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे पैसे त्याची प्रॉपर्टी विकून पैसे देता येतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वाघ हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

इथं केली गुंतवणूक
अजितकुमार कोठारी याने हा पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतविला आहे. डोंबिवलीतील आजदेगाव, दावडी, पडले गाव, कल्याण, अंबरनाथ तसेच दुबई आणि राजस्थान येथील राजसंबध या गावी सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये गुंतविला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

प्रथमेश ज्वेलर्स व मालक यांच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात भादंवी 420, 406 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 2 कोटी 69 लाख रुपये फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. मात्र हा आकडा 8 ते 9 कोटीपर्यंत असण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेटमध्ये त्याने हा पैसा गुंतविल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्याचा प्लॅटही ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. प्रॉपर्टी विकून सर्वसामान्य नागरिकांचे पैसे मिळू शकतील. ज्वेलर्सकडून विविध स्कीम लकी ड्रॉ अथवा भिशी योजना राबविली जाते मात्र भिशी योजना ही बेकायदेशीर आहे.

– विजयसिहं पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -