घरमुंबईडोंबिवलीत विद्यार्थीनीच्या अपहरणाचा डाव फसला !

डोंबिवलीत विद्यार्थीनीच्या अपहरणाचा डाव फसला !

Subscribe

राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणार्‍या डोंबिवली शहरात चोरी, घरफोडी आणि हत्या या नित्याच्याच घटना झाल्या असताना, आता शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. शाळा सुटल्यानंतर एका नववीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला, तुझ्या आईचा अपघात झालाय असे सांगून अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र त्या विद्यार्थिनीच्या सतर्कतेमुळे तिचे अपहरण करणार्‍यांचा डाव फसला आणि अखेर ती सुखरूपपणे घरी पोहचली. मागील आठवड्यात डोंबिवलीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळा परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी पालकांमध्ये जोर धरू लागली आहे.

डोंबिवली पूर्वेतील एका नामांकित शाळेतील इयत्ता नववीत शिकणारी ही विद्यार्थिनी आहे. शाळा सुटल्यानंतर एका इसमाने त्या विद्यार्थिनीला तुझ्या आईचा अपघात झाला आहे, मला तुला न्यायला पाठवले आहे, तू माझ्याबरोबर चल अशी बतावणी केली. त्यानंतर विद्यार्थिनीला हिप्नॉटाईझ करण्यात आले. त्या इसमाने विद्यार्थिनीला लोकलने दिवा येथे नेले. दिवा स्टेशनला उतरल्यानंतर त्या विद्यार्थिनीला ब्रीजच्या खाली उभे करून अपहरणकर्ता फोनवर बोलण्यासाठी ब्रिजवर गेला. भयभीत झालेल्या त्या विद्यार्थिनीच्या मनात संशय आल्याने तिने रडत रडतच रस्त्याने धूम ठोकली. अखेर रस्त्यावरील काही लोकांनी तिला थांबवून विचारपूस केली. तिने हा प्रकार सांगेपर्यंत मात्र तो इसम पळून गेला होता. अखेर त्या मुलीने वडिलांचा फोन नंबर दिल्यानंतर तिच्या वडिलांना फोन करून दिवा येथे बोलाविण्यात आले. मुलगी घरी परत आल्याने पालकांचा जीव भांड्यात पडला. दुसर्‍या दिवशी विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेच्या प्राचार्यांना भेटून हा प्रकार सांगितला. तसेच पालकांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या कानावरही हा प्रकार घातला. मात्र पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार केलेली नाही. भविष्यात एखादी घटना घडू नये यासाठी शाळा प्रशासन, पालक, विद्यार्थी आणि पोलिसांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

- Advertisement -

काय आहे शाळेचे म्हणणे?

शाळेच्या बाहेर हा प्रकार घडल्याने या घटनेविषयी शाळेशी तसा काहीही संबंध येत नाही. मात्र त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी दुसर्‍या दिवशी शाळेत येऊन असा प्रकार घडल्याचे सांगितले होते. याबाबत त्यांची कोणतीही तक्रार नव्हती. शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक असतात. शाळेत आल्यानंतर प्रत्येकाची नोंदणी होते. विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला सुरक्षेबाबत आणि सावधानतेबाबत विशेष सूचना दिल्या जातात. पोलिसांनी शाळा परिसरात गस्त वाढवावी, अशी आमचीही मागणी आहे, असे शाळेच्या प्राचार्यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत घडलेल्या घटना ….

15 जुलै २०१०- मंदार पाटील या सहावीतील विद्यार्थ्याचे १५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते.   मंदारची   सुटका करण्यात पोलिसांना यश आले. पण अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले होते

- Advertisement -

 2 फेब्रुवारी २०१० – तुषार सोनी या १२ वर्षीय विद्यार्थ्याचे ५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या

 15 ऑक्टोबर २००९ – प्रिन्स जैन या १० वर्षाच्या विद्यार्थ्याचे १ कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाले. पण पेालिसांनी त्याची सुखरूपपणे सुटका केली होती .

28 जून २००९ – यश शहा या ११ वर्षाच्या विद्यार्थ्याची २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

असा प्रकार घडल्याचे आमच्याही कानावर आले आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. भविष्यात एखादी घटना घडल्यावर जागे होण्यापेक्षा सर्वांनी अगोदरच सावध राहायला पाहिजे. शाळा परिसरात पोलिसांनी विशेष गस्त वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच संस्थेच्या माध्यमातून पोलिसांची भेट घेणार आहे.
– सुदाम जाधव, अध्यक्ष, जय मल्हार शालेय विद्यार्थी सामाजिक संस्था

विद्यार्थिनीच्या पालकांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला, मात्र संबंधित घटनेची कोणतीही तक्रार दिलेली नाही. या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन त्या शाळेच्या परिसरात तसेच इतर शाळेच्या ठिकाणीही शाळा सुटताना आणि भरतेवेळी पोलिसांची विशेष गस्त वाढवली आहे.

– विजयसिंग पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -