घरमुंबईआईच्या कुशीत ३ वर्षांची नशरा आणि वर शेकडो किलोंचा मलबा!

आईच्या कुशीत ३ वर्षांची नशरा आणि वर शेकडो किलोंचा मलबा!

Subscribe

डोंगरीमध्ये अनधिकृत इमारत कोसळ्यानंतर तिथून वाचलेल्या नागरिकांचे धक्कादायक अनुभव आता समोर येऊ लागले आहेत. त्यातलाच हा एक अनुभव...झिनत सलमानीची आपबीती!

मंगळवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास डोंगरीमधली ४ मजल्यांची एक जुनी इमारत अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि परिसरातल्या नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. एका क्षणात समोरची इमारत होत्याची नव्हती झाली! संध्याकाळ होऊनदेखील घटनास्थळावरचं बचावकार्य अद्याप सुरूच होतं. दुर्घटना घडली, तेव्हा मलब्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची भिती देखील वर्तवण्यात आली होती. त्यातल्याच या ३ वर्षांच्या नशराची ही कहाणी!

आईच्या कुशीत नशरा सुखरूप!

या इमारतीत सलमानी कुटुंब राहात होतं. आई फिरदोस, त्यांचा मुलगा नावेद, मुलगी झिनत आणि झिनतची ३ वर्षांची मुलगी नशरा असे चौघंजण या शेकडो किलोंच्या ढिगाऱ्याखाली अडकले. बचाव पथकानं जेव्हा नशराला या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं, तेव्हा तिच्या अंगावर एकही जखम झालेली नव्हती. तिला बाहेर काढताना बचाव पथकालाही त्या दृश्याचं विशेष वाटलं. नशराला तिची आई झिनतनं कुशीत घेतलं होतं. त्यामुळे ती सुखरूप होती. उलट झिनतला छातीला, नावेदला डाव्या पायाला आणि फिरदोसला डोक्याला मार लागला होता. पण छोट्याशा नशराला जखम झाली नसल्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.

माझा एक पाय दरवाजाच्या लाकडामध्ये अडकल्याने मी ढिगाऱ्याखाली दबली गेले होते. त्यावेळी माझी ३ वर्षांची मुलगी नशरा माझ्या कुशीत होती. मला लोकांनी बाहेर काढलं. सुदैवाने या दुर्घटनेत नशरा सुखरूप आहे.

झीनत सलमानी, नशराची आई

- Advertisement -

हा व्हिडिओ पाहिलात का? – अग्निशमन अधिकाऱ्यानं डोक्यात मारली टपली!

जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इमारत पडली, तेव्हा सलमानी कुटुंब झोपेत होतं. झोपेतच त्यांच्या अंगावर शेकडो किलोंचा मलबा पडला. पण सुदैवानं बचाव पथकानं त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं असून त्यांच्यावर सध्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अगदी चारच दिवसांपूर्वी त्यांनी मिरारोडला नवीन घर घेतलं होतं. काही दिवसांतच नव्या घरी राहायला जाण्याची तयारी सलमानी कुटुंब करत होतं. पण त्याआधीच त्यांना या भीषण दुर्घटनेचा सामना करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -