घरमुंबईDongri Building Collapse : इम्राननं दोघांचा जीव वाचवला, पण...

Dongri Building Collapse : इम्राननं दोघांचा जीव वाचवला, पण…

Subscribe

एक पुरुष आणि एका चिमुकल्याचा जीव वाचवणारा इम्रान जेव्हा रुग्णालयात बेडवर होता, तेव्हा त्याच्या पायावर जरी जखम असली, तरी डोळ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं समाधान होतं...!

डोंगरी परिसरातील केसरबाई इमारत सकाळी ११.३० वाजता कोसळली. सगळीकडे गोंधळ माजला होता. एकीकडे स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सर्वजण धावाधाव करत होते, तर दुसरीकडे याच इमारतीसमोर राहाणारा इम्रान खान मात्र इतरांचा जीव वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होता. स्वत:च्या जीवाचा जरासाही विचार न करता २ जणांना वाचवण्याचं धैर्य इम्राननं दाखवलं. पण या प्रयत्नात तो मात्र स्वत:च जबर जखमी झाला. सध्या इम्रान जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याच्या धैर्याची कथा जेव्हा डॉक्टरांना समजली, त्यावेळी त्यांनी त्याची पाठ थोपटून कौतुकही केले आणि दिलासाही दिला.

काय घडलं त्या मलब्यावर?

दुर्घटनाग्रस्त झालेल्या केसरबाई इमारतीसमोर इम्रान राहतो. तो त्यावेळी घरात काम करत असताना इमारत कोसळत असल्याचं त्यानं पाहिलं. क्षणाचाही विलंब न करता त्याने रहिवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली. बांधकाम कोसळल्यानं मातीचा ढिगारा सर्वत्र पसरला होता. शिवाय, धुळीचंही मोठं साम्राज्य असूनही त्यानं वेळ न दवडता, ढिगाऱ्याखालून २ जणांची सुखरूप सुटका केली. पुढच्या व्यक्तीला वाचवण्यासाठीही इम्रान त्याच वेगानं आणि शिताफीनं पुढे सरसावला. त्याची ऊर्मी त्याला साथ देत होती, पण त्याच्या नशिबानं त्याला साथ दिली नाही. समोरच्या मलब्यात इम्रान पुन्हा हात घालणार इतक्यात वरून त्याच्या अंगावर दगड पडले आणि त्याच्या गुडघ्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यालाही जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. सुदैवानं त्याचा जीव बचावला आहे. पण, आपण २ जणांना वाचवलं याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता!

- Advertisement -

हेही वाचा – दुर्घटनास्थळी नेत्यांची लटांबरं हवीत कशाला?

‘बाहेर पाहिलं तर फक्त इमारतीचा ढिगारा!’

या घटनेविषयी सांगताना इम्रान म्हणाला, “नक्की काय झालं कळतच नव्हतं. इमारतीच्या आवाजाने आताही त्रास होतो. मी बाहेर येऊन पाहिलं तर इमारतीचा ढिगारा पडला होता. मी काही लोकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचं काम केलं. पण, त्यात इमारतीचा एक भाग माझ्याच पायावर कोसळला आणि मी जखमी झालो. मी दोन लोकांना बाहेर काढलं. एक पुरुष होता आणि दुसरं एक लहान बाळ होतं.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -