घरमुंबईमानसिक त्रास नको, पण शाळा सुरू करा - पालिका शिक्षकांचा उद्रेग

मानसिक त्रास नको, पण शाळा सुरू करा – पालिका शिक्षकांचा उद्रेग

Subscribe

एकीकडे पालक दिवाळीपूर्वी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देत असताना मुंबई महापालिकेतील शिक्षकांकडून मानसिक त्रासाऐवजी शाळा सुरू करा म्हणण्याची वेळ आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. हे ऑनलाईन शिक्षण शाळेतील प्रत्येक मुलापर्यंत पोहचवण्यासाठी पालिकेतील शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाबरोबरच पालिकेतील शिक्षकांच्या मागे विविध कामांची जंत्रीच शिक्षण विभागाकडून लावण्यात आली आहे. या कामाची सर्व माहिती आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी सादर न झाल्यास शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी निरीक्षकांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे पालक दिवाळीपूर्वी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देत असताना मुंबई महापालिकेतील शिक्षकांकडून मानसिक त्रासाऐवजी शाळा सुरू करा म्हणण्याची वेळ आली आहे.

पालकांच्या सोयीनुसार सायंकाळचे वर्ग

मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमध्ये २ लाख ८३ हजार ८७६ विद्यार्थी संख्या आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे झोपडपट्टी परिसरात राहणार असून, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सध्या कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक पालकांकडे अ‍ॅण्ड्राईड मोबाईल नाही, तर काहींकडे दोन किंवा अधिक मुले व एकच अ‍ॅण्ड्राईड फोन, काहींना नेट पॅकसाठी पैसे नाहीत अशी अवस्था आहे. त्यातही पालक कामावर जात असल्याने मुलांना अभ्यासासाठी फोन मिळत नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पालिकेचे अनेक शिक्षक पालकांच्या सोयीनुसार सायंकाळी किंवा रात्रीचे वर्ग घेत आहेत. तर अनेक शिक्षक पालकांच्या उपलब्धतेनुसार रविवारीही ऑनलाईन वर्ग घेत आहेत. अनेकदा पालकांच्या मोबाईलचा इंटरनेट डेटा संपत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागत आहे. या सर्व बाबी घेत ऑनलाईन वर्ग घेताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून विविध कामे लावली जात आहेत.

- Advertisement -

शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी लक्ष घाला

बालक-पालक मित्र योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी एकत्र आणण्याबरोबरच केलेल्या कामाची माहिती विविध लिंकवर भरणे, अहवाल सादर करणे, ऑनलाईन व ऑफलाईन कॅटलॉग भरणे, ऑनलाईन लेक्चरची माहिती देणे, झूम, जीओ आणि गुगल मीटवर किती लेक्चर घेतले याची सर्व माहिती शिक्षण विभागाला रविवारी देणे अपेक्षित असताना निरीक्षकांकडून गुरुवारीच मागवण्यात येत आहे. ही माहिती देण्यास शिक्षक किंवा मुख्याध्यापकांकडून देण्यास विलंब झाल्यास निरीक्षकांकडून थेट निलंबनाच्या कारवाईची धमकीच शिक्षकांना देण्यात येते. लिंकवर माहिती भरताना शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकांकडे संगणक नसल्याने त्यांना मोबाईलवर माहिती भरावी लागते. मात्र एक्सलशीटमध्ये त्यांना काम करणे शक्य होत नाही. अशा शिक्षकांना शाळा निरीक्षकाकडून वारंवार देण्यात येणार्‍या अपमानास्पद भाषेमुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाऐवजी प्रत्यक्ष शाळा सुरू करा अशी म्हणण्याची वेळ पालिकेच्या शिक्षकांवर आली आहे. पालिका प्रशासनाकडून मिळत असलेल्या वागणुकीबाबत शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी लक्ष घालावी अशी मागणीही शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

वेतन न काढण्याची धमकी

राज्य सरकारने सर्व कर्मचार्‍यांना एमएस-सीआयटी हा कोर्स बंधनकारक केले आहे. त्यानुसार शिक्षकांनी हा कोर्स केला आहे. परंतु प्रत्यक्षात संगणकावर काम नसल्याने अनेक शिक्षक हे टेक्नोसेव्ही नसल्याने त्यांना कामे करण्यात अडचणी येतात. अशा कर्मचार्‍यांना शाळा निरीक्षकांकडून तुमचे प्रमाणपत्र बनावट आहे का? अशी विचारणा करत त्यांचे वेतन न काढण्याची धमकी देण्यात येते.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -