जेवणाच्या वादातून दुहेरी हत्याकांड मारेकरी बारा तासात गजाआड

Mumbai
arrested of merchant fraud

मॅनेजर स्वतः हॉटेलमधून जेवण मागवून खातो. पण, आपल्याला मात्र डाळ भात खायला घालत होता. त्यावरून वाद झाल्यास मॅनेजर आणि दुसरा नोकर मारहाण करीत असल्याचा राग मनात ठेऊन त्याच हॉटेलमधील एका कर्मचार्‍याने मॅनेजर आणि सहकारी कर्मचार्‍याची फावड्याने वार करून हत्या करून दोन्ही मृतदेह हॉटेलमधील पाण्याच्या टाकीत फेकल्याचे उजेडात आले आहे. पोलिसांनी अवघ्या बारा तासात दुहेरी हत्याकांडातील मारेकर्‍याला पुण्याहून अटक केली. या मारेकर्‍यावर कोलकाता येथे एक खुनाचा तर पुण्यात मारामारी व दारूबंदीचा गुन्हा असल्याचे तपासात उजेडात आले आहे.

मीरा रोड येथील शबरी बार अँड रेस्टाँरंटचा मॅनेजर हरिश शेट्टी आणि मोरी कामगार नरेश पंडीत याची फावड्याने वार करून हत्या करून दोघांचेही मृतदेह हॉटेलमधील पाण्याच्या टाकीत टाकून तिसरा कर्मचारी फरार झाला होता. पळून जाताना मारेकरी दोघांचे मोबाईल फोनही घेऊन गेला होता. त्यामुळे मीरा रोड पोलिसांनी अवघ्या बारा तासात पुण्याच्या स्वारगेट परिसरातून मारेकरी कल्लू राजू यादव (वय ३५, मूळ रा. कंचनपूर, पिपरी, जि. महू, उत्तर प्रदेश) याला अटक केली. सध्या लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद असून कर्मचारी आपापल्या गावी निघून गेले आहेत. हॉटेलमध्ये मॅनेजर हरिश शेट्टी, नरेश पंडित आणि कल्लू यादव हे तिघेच रहात होते. मॅनेजर हरिश शेट्टी बाहेरच्या हॉटेलचे जेवण मागून खात असे. आपल्याला मात्र नेहमी डाळ भात खावा लागत असल्याची यादव याची तक्रार होती. त्यावरून दोघांमध्ये नेहमी वादही होत असत. गुरुवारी रात्री जेवणावरून वाद झाला.

त्यावेळी हरिश शेट्टी आणि नरेश पंडित यांनी कल्लूला मारहाण केली. हा राग मनात ठेऊन कल्लूने दोघेही झोपी गेल्यानंतर रात्री फावड्याने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचेही मृतदेह हॉटेलमधील पाण्याच्या टाकीत टाकून तो पुण्याला पसार झाला होता. कल्लूला पकडण्यासाठी पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरु केला होता. कल्लू पळून जाताना आरोपींचे मोबाईलही घेऊन गेला होता. त्यामुळे कल्लूसह दोघांच्या मोबाईल लोकेशनचा माग काढत पोलीस उपनिरीक्षक चेतन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वेळे, अशोक पाटील, प्रदीप टक्के, अनिल रावराणे यांच्या पथकाने कल्लूला पुण्यातील स्वारगेट परिसरातून शुक्रवारी संध्याकाळी अटक केली.

दरम्यान, कल्लू सराईत गुन्हेगार असून कोलकत्ता येथे एका खूनाच्या गुन्ह्यात तो जेल भोगून आलेला आहे. तसेच पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात मारामारी आणि दारूबंदीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.