घरमुंबईहिंदुत्वासाठी झेंड्यातील हिरवा रंग काढा : शिवसेना नेते अनिल परब

हिंदुत्वासाठी झेंड्यातील हिरवा रंग काढा : शिवसेना नेते अनिल परब

Subscribe

तुम्हाला प्रखर हिंदुत्व हवे असेल तर पहिला झेंड्यातील हिरवा रंग काढा. निखळ भगवा म्हणजे त्यात भेसळ नको, आमच्या झेंड्यात हिरवा रंग आहे का? अशी घणाघाती टीका शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर केली.

तुम्हाला प्रखर हिंदुत्व हवे असेल तर पहिला झेंड्यातील हिरवा रंग काढा. निखळ भगवा म्हणजे त्यात भेसळ नको, आमच्या झेंड्यात हिरवा रंग आहे का? अशी घणाघाती टीका शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर केली. शिवसेनेला चौकशीची भिती दाखवून तुटणारी नाही. बाळासाहेबांनी हाडाचे शिवसैनिक तयार केले आहेत. त्यामुळे भिती दाखवून, फोडाफोडा करून शिवसेना तुटण्याइतकी लेचीपेची नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

महाआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी ‘आपलं महानगर/माय महानगर’ला खुल्लमखुल्ला या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेण्याबरोबरच कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेना मोठी झालेली आहे. त्यामुळे सत्तेचा फायदा कार्यकर्त्यांसाठी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले. भाजपकडून सध्या शिवसेनेच्या नेत्यांविरोधात कारवाईचे शस्त्र उगारण्यात आले आहे, यावर परब यांनी तुमच्याकडे चौकशीचे शस्त्र असेल तर आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. तुमच्याकडे केंद्रातील एजन्सी असतील तर आमच्याकडेही महाराष्ट्रातील एजन्सी आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या चौकशा करून भिती दाखवण्याने शिवसेना तुटेल असे ज्यांना वाटत आहे तो त्यांचा गैरसमज आहे. बाळासाहेबांनी हाडाचे शिवसैनिक तयार केले आहेत. आमचे आमदार हे कष्ट करून झाले आहेत. त्यामुळे शिवसेना भिती दाखवल्याने तुटेल असे काहीच होणार नाही. त्यामुळे सुडाचे राजकरण करू नका, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला. तसेच हिंदुत्व सोडणे म्हणजे धोतर सोडणे नव्हे, असे सांगत त्यांनी भगवा हा निखळ असला पाहिजे त्यात भेसळ नको, आमच्या झेंड्यात हिरवा रंग आहे का? तुमचे हिंदुत्व प्रखर असेल तर त्यातील हिरवा रंग प्रथम काढा अशी टीकाही त्यांनी केली. लोकांना कोण कडवट हिंदू आहे हे माहित आहे. हिंदूत्व नसानसांत असले पाहिजे, आमची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी झाली म्हणजे आम्ही धर्मनिरपेक्ष झालो असे नाही. आमचा अजेंडा हिंदूत्व आहे तो सांभाळण्याचा आम्हाला अधिकार आहे. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदु शिवसेनेपासून दुरावतील असे मला कोठे वाटत नाही. कारण वेळ पडली तर त्याच्या मागे शिवसेना व उद्धव ठाकरेच उभे राहणार हे त्यांना चांगले ठाऊक आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कोणी विचारत नसल्याने वैफल्यगस्त

ठाकरे हे नाव एका दिवसात आलेले नाव नाही त्यामागे अनेक प्रयत्न आहेत. ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि भाजपकडून तोच बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु सूर्यावर थुंकल्याने काय होते हे मी सांगायचे गरज नाही. ज्याला आरोपच करायचे आहेत ते आरोप करत राहणार. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने सध्या भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. सत्तेत असताना त्यांनी त्याचा पुरेपुर वापर केला. परंतु आता त्यांना कोणीच विचारत नसल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. एखादी गोष्ट पचवायाला ताकद लागते ती यांच्यामध्ये नसल्याने ते शिवसेनेवर आरोप करत सुटले आहेत. सुशांत सिंग प्रकरण, कंगना रानौत या माध्यमातून त्याने आरोप करण्याचा प्रयत्न केला. पण आता काय झाले त्याचे असा प्रश्न परब यांनी उपस्थित करताना किरीट सोमय्या याने माझ्यावरही आरोप केले. पण ते सिद्ध करू शकले नाहीत. ती फक्त बदनामी करण्याचा प्रयत्न आहे.

नेत्यांना चुचकारण्यासाठी तारखांचा खेळ

भाजपमध्ये सध्या विविध पक्षातून मोठ्या प्रमाणात नेते, कार्यकर्ते आले आहेत. त्यांना चुचकारण्यासाठी भाजपकडून तारखांचे खेळ करण्यात येत आहे. या नेते-कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार पाडण्याबाबत वारंवार तारखा दिल्या जात आहेत. पण हा वेळ काढण्यासाठी भाजपचा केविलवाणा प्रयत्न आहे, हे जाणीवपूर्वक ठरवून केले जात आहे. आमचे तीन पक्षाचे सरकार असले तरी आमच्याकडे १७१ आमदार आहेत. हा आकडा जेव्हा १४४ च्या खाली येईल तेव्हाच आमचे सरकार पडेल, पण तो खाली येणे शक्य नाही. कारण आमचे सरकार हे कॉमन मिनिमम प्रोगामवर काम चालू आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवणे हा आहे. त्यामुळे आमच्यात आपसांत भांडणे होत नाहीत.

- Advertisement -

कोरोनाविरोधातील लढ्याला प्राधान्य

कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर प्रथम रोडमॅप बनवतो. त्याप्रमाणे आम्हीही बनवला पण अवघ्या दोन महिन्यातच कोविडचे संकट आल्याने आमचे प्राधान्य बदलले. लोकांना कोरोनापासून वाचवणे ही आमची प्राथमिकता झाली. कोविडमध्ये लोकांना मदत करण्यासाठी आमचे कार्यकर्ते पुढे सरसावले. त्यामुळेच आम्ही अनेक चांगले कार्यकर्ते गमावले. अन्य पक्षातील किती कार्यकर्ते बाहेर पडले. घरात बसले असते तर ते गेले नसते. लोकांच्या सेवेला आम्ही उतरले म्हणून त्यांना गमावले. कोविड आल्यापासून आम्ही रस्त्यावर काम करत आहोत. दिवसरात्र मी स्वत: हॉस्पिटलमध्ये फेर्‍या मारत होतो. ते सोडून आम्ही जनत दरबार नाही घेऊ शकत. ज्या कामाला प्राधान्य देणे गरजेचे होते त्याला आम्ही प्राधान्य दिले. आम्ही जनता दरबार घेण्याऐवजी लोकांना कोरोनामधून वाचवण्याला प्राधान्य दिले. जेव्हा कोरोनातून बाहेर येऊ तेव्हा आम्ही जनता दरबार घेऊ.

कंगणावरील कारवाईचे समर्थन

कंगणाच्या घरावर महापालिकेने केलेल्या कारवाईचे आम्ही समर्थन करतो. कोणीही बेकायदा बांधकाम केले तर ते तोडले पाहिजे कंगणाने बांधले म्हणून तोडायचे नाही आणि सर्वसामान्यांच्या घरावर कारवाई करायचे असे नसते. सर्वांना कायदा सारखाच असला पाहिजे. राजकीय नेत्यांची बांधकामेही तोडली पाहिजेत. सुशांत सिंगच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस लावू शकत होती. पण शिवसेनेची कोंडी करण्यासाठी त्यात सीबीआयला आणण्याची कुटनिती भाजपकडून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

सत्ता म्हणजे मदत, सत्ता म्हणजे आधार

सत्ता म्हणजे मदत, सत्ता म्हणजे आधार तो देण्याचे काम आमचा पक्ष करत आहे. सत्तेत आल्यामुळे मला ज्या गोष्टी रस्त्यावर करायला लागत होत्या त्या मी खुर्चीवर बसून करत आहेत. त्यामुळे सत्तेचा फायदाच होत आहे. मी जेव्हा सत्तेत नव्हतो तेव्हा रात्री अपरात्री उठून जावे लागत होते. पण आता मंत्री झाल्यावर एका फोनवरून कामे होत आहे. त्यामुळे सत्तेचा फायदा कार्यकर्त्यांना झाला. वाढीव वीज बिलाचा विषय आमच्याही जिव्हाळ्याचा आहे. अंतिम निर्णयापर्यंत आल्यावर आमची भूमिका जाहीर करू.

अमराठींचेही शिवसेनेला मतदान 

मुंबई महपालिकेसंदर्भातील निर्णय परिस्थितीनुसार घेतले जातात. ते पक्ष प्रमुख घेतील, उद्धव साहेबांनी एखादा निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्यच असतो. मुंबई उपनगरामध्ये शहरापेक्षा अधिक लोकसंख्या आहे. वांद्रे ते दहिसरपर्यंत १०२ जागा आहेत, त्यातील ५० टक्के जागा आम्ही जिंकतो. महापालिकेमध्ये कार्यकर्ता आणि मतदाराची एक नाळ जोडलेली आहे. ती नाळ आम्हाला मतदान करते. आमचे कित्येक नगरसेवक आहेत जे परप्रांतियांच्या मतदारसंघातून निवडून येत असतात. त्यामुळे मराठीप्रमाणे अमराठीही शिवसेनेला मतदान करत आहेत.

मराठा आरक्षणामध्ये सरकार कमी पडत नाही

मराठा आरक्षणामध्ये सरकार कमी पडत नाही. मागील सरकारने दिलेल्या आरक्षणाला दिलेले आव्हान उच्च न्यायालयात टिकले. ज्या वकीलांनी उच्च न्यायालयात आरक्षण मिळवून दिले. त्याच वकीलांना आम्ही सर्वोच्च न्यायालयात कायम ठेवले. मुकुल रोहतगी, अ‍ॅड थोरात अशा दर्जाचे वकील आम्ही त्यात ठेवले. पाचपेक्षा जास्त न्यायाधीशांच्या घटानापीठाकडे आम्ही अर्ज केला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. २९ राज्यांमधून आरक्षणाच्या याचिका आल्या असताना फक्त महाराष्ट्रातच स्थगिती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्थगिती काढण्यसााठी सरकार प्रयत्न करत आहे. मग यामध्ये सरकार कमी कोठे पडते आहे. हे माथी भडकवण्याचे काम आहे. आरक्षण टिकण्यासाठी जे काही करायला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -