घरमुंबईमद्यधुंद चालकाची समजूत काढणे बेतले जीवावर

मद्यधुंद चालकाची समजूत काढणे बेतले जीवावर

Subscribe

खारघर टोलनाका येथील घटना

शुक्रवारी मध्यरात्री 12:10 च्या सुमारास ऑइल घेऊन जाणार्‍या मद्यधुंद ट्रकचालकाला टोलवरच्या कर्मचार्‍यांनी रोखले. त्याला ट्रक बाजूला लावण्याचे सांगत त्याला समजावले जात असताना मद्यधुंद चालकाने समोर थांबलेल्या टोल कर्मचार्‍यांमधून ट्रक दामटवण्याचा प्रयत्न केला. यात एकाला जीव गमवावा लागला आणि दुसरा एक जण जखमी झाला.

शुक्रवारी पुण्याहून मुंबईच्या दिशेने ऑइलचा ट्रक घेऊन ट्रकचालक शिवप्रकाश सरज (रा.प्रतापगड, उत्तर प्रदेश) निघाला होता. खारघर टोलनाक्याजवळ आला असता येथील कर्मचार्‍यांना तो मद्यधुंद अवस्थेत असलेला आढळून आला. यावेळी सर्वच कर्मचार्‍यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत तो नसल्यामुळे समोर टोलनाक्यावरील कर्मचारी उभे आहेत याचा कसलाही विचार न करता तडक आपल्या ताब्यातील ट्रक बेदरकारपणे घेऊन निघून गेला. मात्र, यावेळी येथील सुपरवाझर असलेला प्रकाश जोशी (38) याच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गोरख पाटील (30) हा जखमी झाला आहे.

- Advertisement -

यावेळी दोघांना उडवून तो पसार होण्याच्या नादात येथील बॅरिगेटला धडक देत एका टेम्पोलाही धडकला. तरीही तो थांबला नाही. यावेळी धडक बसलेल्या टेम्पोने त्याला नेरुळ येथे अडविले असता ट्रकमधील चालक पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र, ट्रकवरील क्लिनर आणि ट्रक ताब्यात घेण्यात आला. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, ट्रकचालक मात्र फरार झालेला आहे. या ऑइल ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल असल्यामुळे 30 टन इतके वजन पेलवण्याची क्षमता असलेली क्रेन हा ट्रक हटवण्यासाठी गरजेची आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -