तपासणीतील दिरंगाईमुळे डॉक्टरसह कर्मचार्‍यांना धोका

ऐरोली मधील माता बाल रुग्णालयातील प्रकार

Mumbai
Jijau Mata Bal Hospital

हेपेटाइटीस बी आजाराची लागण असलेल्या महिलेची प्रसूती करताना योग्य त्या साधनांचा वापर न करण्यात आल्याने ऐरोलीमधील राजमाता जिजाऊ माता बाल रुग्णालयातील तीन डॉक्टर आणि तीन सफाई कर्मचारी यांना त्या आजाराची लागण झाल्याची दाट शक्यता होती. हा आजार गंभीर असल्याने यावर तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे. यातील डॉक्टरांनी वेळीच उपचार घेतले. मात्र सफाई कामगार महिला कर्मचार्‍यांच्या उपचाराबाबत रुग्णालयाकडून दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे त्यांना या आजाराचा धोका निर्माण झाला असून आजार रोखण्यासाठी उपचारांची पराकाष्ठा करावी लागत आहे.

ऐरोली मधील राजमाता जिजाऊ माता बाल रुग्णालयात 27 फेब्रुवारी रोजी शीतल प्रमोद शिंदे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. ही महिला 21 फेब्रुवारी पासून नियमितपणे प्रसूतीपूर्वीच्या तपासण्या करत होती. तरीही त्या महिलेला या आजाराची लागण असल्याची बाब तपासणीत समोर आली नाही. त्यातच 27 फेब्रुवारी सकाळी 7 च्या दरम्यान या महिलेस प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. त्या नंतर 8 च्या सुमारास या महिलेची नॉर्मल प्रसूती झाली.

परंतु त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर तसेच इतर कर्मचारी प्रसुती प्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या रक्तसंपर्कात आले होते. त्यामुळे डॉ.रावल, डॉ.चेतना या दोन डॉर्क्टर्स तसेच नर्स पालांडे आणि वंदना सावलेकर, अनिता राठोड आणि सरिता घाघट या तीन सफाई कामगार (मावशी) हे रक्तसंपर्कात आले होते. त्याच वेळी शिंदे यांची हेपेटाईटीस बी आजाराची तपासणी झाली नसल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी घाईघाईने रक्त व इतर तपासणी केली असता रुग्ण महिलेला हेपेटायटीस बी आजार असल्याचे स्पष्ट झाले. या माहितीचा धसका डॉक्टर व सफाई कामगार यांनी घेतला असता त्यांनी तत्काळ उपचारासाठी धावपळ सुरू केली.

या आजाराचे उपचार महाग असल्याने त्याची तरतूद कशी करायची, असाही प्रश्न उपस्थित झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. या आजाराच्या संपर्कात आलेल्या दोन डॉक्टर, एक नर्स यांनी तात्काळ उपचार केले. मात्र महिला सफाई कर्मचारी यांना मात्र वार्‍यावर सोडण्यात आले. रक्तसंपर्कात आल्यावर पाच दिवसांत उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी मोठा खर्च असल्याने संबंधित सफाई कर्मचारी हतबल झाले होते.

आम्ही या रुग्णालयात अनेक वर्षापासून काम करत आहोत. या ठिकाणी आम्हाला कीपर म्हणून नेमण्यात आले असता त्याचाच पगार अदा करण्यात येतो. या व्यतिरिक्त आम्हाला इतर कामे करावी लागतात. अनेकवेळा उपचारावेळी लागणार्‍या सुविधाही आम्हालाही देण्यात येत नाहीत. डॉक्टरांनी स्वतःवर उपचार करण्याची तत्परता दाखवली तशी आमच्याबाबतही दाखवायला हवी होती. आम्ही उशिराने का होईना उपचार पदरात पाडून घेतले आहेत. मात्र संसर्गाची भीती आहेच.
– वंदना सावलेकर, (मावशी) सफाई कामगार

सदर प्रकार ज्यावेळी लक्षात आला त्यावेळी आम्ही तत्काळ त्यावर उपाययोजना केल्या. त्याचबरोबर सफाई कामगार यांच्यावरही उपचार व्हावे यासाठी प्रयत्न केले.
डॉ.वर्षा राठोड, व्यवस्थापक, राजमाता जिजाऊ माता बाल रुग्णालय, ऐरोली