घरमुंबईपालिकेचा पुन्हा हलगर्जीपणा; उघड्या गटारात पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

पालिकेचा पुन्हा हलगर्जीपणा; उघड्या गटारात पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर पालिकेने झाकण किंवा जाळी न बसविल्यामुळे १५ ते २० फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. स्थानिकांनी या मृत्यूला सर्वस्वी पालिकेलाच जबाबदार असल्याचे म्हणत, पालिकेवर गुन्हा दाखल केला आहे.

भर पावसात उघड्या मॅनहोलमध्ये पडून सुप्रसिद्ध डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने पालिकेवर न्यायालयाने ताशेरे ओढले. तेव्हा पालिकेला प्रचंड टिकेला सामोरे जावे लागले होते. यानंतरही पालिकेने आपला हलगर्जीपणा उघड केला. पालिकेने दुर्लक्ष करून उघड्या ठेवलेल्या गटारात पडून कुर्ला येथिल एका युवकाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव दिनेश प्रकाश जटोलिया असून तो २४ वर्षांचा आहे. या प्रकरणी महापालिकेवर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर सायनकडून चेंबूरकडे जाताना कुर्ला सिग्नलजवळ सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मध्यभागी गटाराचे काम सुरु आहे. गटार तीन आठवड्यांपूर्वी बंदिस्त करण्यात आले असले तरी गटारावर काही ठिकाणी झाकणे बसवण्यात आलेली नव्हती. शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दोन व्यक्ती कुर्ला सिग्नलकडून चेंबूरच्या दिशेने या गटारावरून जात होत्या. इतक्यात अचानक आवाज आला. मागील व्यक्तीला पुढील व्यक्ती गटारात पडल्याचे समजताच त्याने आरडाओरड सुरू केली. जवळच असलेल्या प्रगती या इमारतीतील नागरिक मदतीला धावून आले. एकाने अग्निशमन दलाला तर एकाने पोलिसांना फोन लावला. तोपर्यंत काही जणांनी बांबू आणि शिडीच्या मदतीने त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

मृत्यूला सर्वस्वी पालिका जबाबदार

गटार १५ ते २० फूट खोल असल्याने जलोटिया याला बाहेर काढता आले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. डॉ. अमरापूरकर यांच्यासारख्या सुप्रसिध्द डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतरही पालिकेला जाग आलेली नाही, हे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले. कंत्राटदाराने गटाराचे काम झाल्यावर त्यावर झाकण लावले नव्हते. गटारात पडून अपघात होऊ नये, म्हणून उघड्या गटारांवर झाकण वा जाळी बसवायला हवी असे निर्देश, डॉ. अमरापुरकर यांच्या अपघातानंतर संबंधितांना देण्यात आले होते. मॅनहोलमध्ये पडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. यामुळे पडलेली व्यक्ती मृत्युमुखीच पडली पाहिजे, अशी तरतूद पालिकेने केली आहे, असा आरोप भीमराव घोडके यांनी केला. जटोलिया याच्या मृत्यूला सर्वस्वी पालिका जबाबदार असल्याने संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी घोडके यांनी केली. मृत दिनेश मूळ राजस्थान नागोरी येथील रहिवाशी आहे. मुंबईत तो ठक्कर बाबा कॉलनीमधील एका चप्पलच्या कारखान्यात काम करत होता. या दुर्घटनेबाबत कुर्ला नेहरूनगर पोलीस ठाण्यात ३०४ अ या कलमान्वये पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा (२४७/२०१८) नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

मृत्यूनंतरही परवड

उघड्या गटारात पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीची नोंद अनोळखी म्हणून पोलिसांनी केली आहे. मृतदेह दिनेश जलोटियाचा असल्याचे त्याच्या बाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी ओळखले आहे. रहिवाशांनी त्याची माहिती पोलिसांना देऊनही त्याची अनोळखी म्हणून नोंद करून दिनेशची मृत्यूनंतरही परवड केल्याचा आरोप केला जातो. पोलिसांच्या या कृतीमुळेच त्याचे शवविच्छेदन करण्यात आलेले नाही. दिनेशचे नातेवाईक राजस्थानला राहत असून रविवारी सकाळी मुंबईत पोहचत आहेत. त्यानंतरच त्याचे शवविच्छेदन केले जाणार आहे. याबाबत तपास अधिकारी अमोल कदम यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -