घरमुंबईकोटीव्हीएम मशीनचा उडाला बोजवारा

कोटीव्हीएम मशीनचा उडाला बोजवारा

Subscribe

मुंबईतील रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर वाढत्या गर्दीपासून प्रवाशांच्या सुटकेसाठी रेल्वे विभागाने तीन वर्षांपूर्वी कोटीव्हीएम मशीन आणली होती. मात्र केंद्र सरकारकडून नव्या नोटा चलनात आणल्यामुळे आणि कोटीव्हीएम मशीनमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने रेल्वेच्या या मशीनच्या सेवेचा पूर्णपणे बोजावारा उडालेला आहे. त्यामुळे प्रवाशांनी आता या कोटीव्हीएमकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोटीव्हीएम मशीनमधून तिकिट काढण्याचे प्रमाण ५० टक्के कमी झाले आहे.

रेल्वे तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी रेल्वेने सीटीव्हीएम मशीन, यूटीएस अ‍ॅपसोबत अनेक उपक्रम राबविणे सुरू केले आहेत. असाच एक उपक्रम २०१६ मध्ये मध्य रेल्वे मंत्रालयाने हाती घेतला होता. त्याअंतर्गत देशभरात ४०० कॅश अ‍ॅण्ड कॉइन ऑपरेटेड तिकीट वेण्डिंग मशीनची (कोटीव्हीएम) घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली होती. मात्र आज या मशीनचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. ही मशीन १० रुपयांची नवीन नोट स्वीकारत नाही. सोबतच त्यात सतत तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे प्रवाशांनी या मशीनकडे पाठ फिरवल्याचे चित्र आकडेवारीतून समोर येत आहे. २०१७ च्या आक्टोबर महिन्यात पश्चिम रेल्वेच्या एकूण ३२ कोटीव्हीएम मशीनच्या माध्यमातून १ लाख ६ हजार ४९९ एवढी तिकीट विक्री झाली होती. त्यामाध्यमातून २० लाख ६ हजार ३९० रुपयांच्या महसूलसुद्धा गोळा करण्यात आला होता.

- Advertisement -

२०१७ च्या तुलनेत २०१८ च्या ऑक्टोबर महिन्यात ६१ हजार ४२३ तिकीट विक्री झाली. त्यामुळे एकूण ५० टक्क्यांची घट झाली आहे. कोटीव्हीएमच्या तिकीट विक्रीत घट येण्याचे मुख्य कारण म्हणजे चलनात आलेल्या नव्या नोटा आणि सतत तांत्रिक बिघाडामुळेही घट आल्याचे रेल्वे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून नव्या नोटा चलनात आणल्यामुळेही कोटीव्हीएम मशीन या नव्या नोटा स्वीकारत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना जुन्या नोटा शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

प्रवाशांना या मशिनचा अनुभव नाही
कित्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांनाही कोटीव्हीएम मशीन वापरण्याची माहिती नाही. प्रवासी या मशीनवर तिकीट काढण्याकरिता जातात, मात्र काहीवेळा या कोटीव्हीएम मशीन जुन्या नोटा घेत नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना वारंवार नोटा बदलाव्या लागतात. इतकेच नव्हे तर नवीन नोट असल्यास प्रवाशांना जुन्या नोटा शोधण्यासाठी धावपळ करावी लागते. या संबंधित कित्येक रेल्वे प्रवाशांनी रेल्वे अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या, मात्र यावर रेल्वे दखल घेत नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

एकूण १५२ कोटीव्हीएम मशीन
मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सरासरी १५२ सीटीव्हीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी बहुतेक सीटीव्हीएम मशीन बंद आहेत. रेल्वेमंत्र्यानी मोठा गाजावाजा करत २०१५ च्या अर्थसंकल्पात सीटीव्हीएम यंत्रांबाबत घोषणा केली होती. त्यानुसार रेल्वे स्थानकांमध्ये कोटीव्हीएम बसवण्यात आले होते. त्या पाठोपाठ पश्चिम रेल्वेवरसुद्धा ही यंत्रणा बसविण्यात आली होती. सध्या मध्य रेल्वेवर ११०, तर पश्चिम रेल्वेवर ३२ कोटीव्हीएम मशिन आहेत. ही कोटीव्हीएम यंत्रे अत्यंत गर्दीच्या अशा सीएसटी, दादर, ठाणे आदी स्थानकांवर लावली आहेत. सीटीव्हीएमवरून तिकीट काढणे प्रवाशांसाठी खूप सोपे असून त्यासाठी कोणत्याही स्मार्ट कार्डची गरज नाही. प्रवाशाने तिकीटाची अचूक रक्कम यंत्रात टाकल्यावर तिकीट मिळते. मात्र या मशिनमध्ये नवीन १० रुपयांची नोट चालत नाही. अशी नोट मशिनमध्ये टाकली असता ती परत येते. सोबत कोटीव्हीएम मशिनमध्ये येत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे प्रवासी या मशिनकडे आता पाठ फिरवली आहे. त्याचा फटका रेल्वेला बसत आहे.

मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी कोटीव्हीएम मशीन आणली खरी, मात्र त्यात सतत बिघाड होत आहेत. कित्येक रेल्वे स्थानकांवरील या कोटीव्हीएम मशीन बंद अवस्थेत आहेत. मात्र रेल्वे याबद्दल काही पावले उचलायला तयार नाही. रेल्वेकडून या मशीनची योग्य देखभाल करायला हवी.
– सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -