घरमुंबईराज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पदाधिकारी सैरभर, नव्या पक्षाच्या शोधात

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पदाधिकारी सैरभर, नव्या पक्षाच्या शोधात

Subscribe

दरम्यान मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरे काय निर्णय घेणार? याकडे आमचे डोळे लागले असून, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ असे खाजगीत बोलताना सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असताना राज ठाकरे यांचे मनसेचे पदाधिकारी मात्र सैरभर झाले आहेत. त्याचे कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या मनसेच्या बैठकीत मनसेने विधानसभा निवडणूक लढवावी की लढू नये याबाबत स्वतः राज ठाकरे यांच्या मनात संभ्रम असून, त्यांनी निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय काही दिवसात कळवेन असे उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आपण काय करायचे? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरे काय निर्णय घेणार? याकडे आमचे डोळे लागले असून, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ असे खाजगीत बोलताना सांगितले.

मनसेने निवडणूक लढवावी अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा 

दरम्यान कृष्ण कुंज येथे राज ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेने ही निवडणूक लढवायला हवी असे राज ठाकरे यांना सांगितले. पण राज ठाकरे यांची मात्र ही निवडणूक लढवण्याची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बैठकीतून बाहेर पडलेल्या काही पदाधिकाऱ्यांना काय करावे? असा प्रश्न पडला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मनसेच्या अनेक इच्छुकांनी मागील चार वर्षांपासून आपापल्या मतदारसंघात मोर्चे बांधणी केली असून, जर मनसे निवडणूक लढणार नसेल तर आपण चार वर्ष घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल अशी भावनाच काही इच्छुकांनी खाजगीत बोलून दाखवली. त्यामुळे काही जण आता दुसरा पर्याय देखील शोधू लागल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मी निवडणूक लढवणार नाही – इंदुरीकर महाराज

म्हणून राज ठाकरे संभ्रमात 

राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. तसेच निवडणूक लढवणार असाल तर पैसे कुठून उभे कराल? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना विचारला. तसेच मंदीचे सावट असताना निधी देणारेही हात आखडते घेतील. त्यावेळी तुम्ही काय कराल? असे सांगत मी तुमची मते जाणून घेतली आहेत. येत्या दिवसात मी माझा निर्णय तुम्हाला सांगेन, असे राज ठाकरेंनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगत निवडणूक न लढण्याचेच संकेत या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

राज ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यावर चर्चा झाली. मात्र निर्णय काय झाला ते जाहीर करण्यात आलेले नाही. योग्य वेळी राज ठाकरे निर्णय जाहीर करतील.
बाळा नांदगावकर, मनसे नेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -