ई-चलन दंडाचा फुसका बार

काही वाहन चालकांकडून रक्कम भरली नसावी. यामध्ये कमी जास्त होतच राहते. आता माझ्याकडे नेमका दंडाचा आकडा नाही. माहिती काढून सांगण्यात येईल. - अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (वाहतूक)

Mumbai

मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांकडून ई-चलनाद्वारे दंड आकारला जात असून या उपक्रमाला जवळ जवळ अडीच वर्षे पूर्ण होत आली आहेत. मात्र या अडीच वर्षांत ई-चलनाद्वारे शासनाला मिळणार्‍या महसुलात घट होताना दिसत आहे. ई-चलनाद्वारे वाहनचालकांना आकारण्यात येणार्‍या दंडापैकी केवळ ४० टक्के दंडाची रक्कम जमा झाली आहे. ६० टक्के दंडाची रक्कम म्हणजे तब्बल ११८ कोटी, 63 लाख रुपये वाहन चालकाकडून येणे बाकी आहे. ही धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघडकीस आली असून. ही रक्कम कशी वसूल करायची हा प्रश्न संबंधित विभागाला पडला आहे.

११८ कोटी 60 लाख रुपये हा आकडा केवळ जुलै २०१८ पर्यंतचा असून यात घट किंवा वाढ झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ई-चलन या उपक्रमाचा केवळ दंडाच्या रकमेची वसुली करणे हा उद्देश नसून याचा मुख्य उद्देश वाहन चालकांना शिस्त लावणे हा आहे, असे वाहतूक विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणार्‍या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी, तसेच वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणार्‍यांना चाप बसवण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाचा पारदर्शी कारभार होण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या सहमतीने मुंबई पोलीस वाहतूक विभागाकडून ई-चलन हा उपक्रम सुरु करण्यात आला. याद्वारे वाहन चालकांना दंड आकारला जाऊ लागला.

हा उपक्रम राबवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून महत्त्वाच्या ठिकाणी सी लिंक तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच अन्य मार्गावर स्पीडगन कॅमेरे बसवण्यात आले. ज्या ठिकाणी वाहनांना गतीची मर्यादा दिली आहे त्या ठिकाणी तुमच्या वाहनांची गती अधिक आढळल्यास तुमचे वाहन आणि त्याचा क्रमांक कॅमेर्‍यात कैद होऊन आपण दंडास पात्र ठरतो. तसेच वाहतुकीचे नियम मोडणारे, नो पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग करणार्‍यासाठी वाहतूक पोलिसांना ई-चलन मशीन देण्यात आले आहे. हे वाहतूक पोलीस तुमच्यासोबत हुज्जत न घालता ई-चलन मशीनमध्ये तुमच्या वाहनाचा क्रमांक कॅमेर्‍यात कैद करून दंडाची पावती वाहन मालकाच्या घरी अथवा मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येते.

सुसाट जाणार्‍या वाहनांचा या कॅमेर्‍यात क्रमांक टिपला जातो. परिवहन विभागात त्याची नोंद होते. वाहनाच्या मालकाला त्याच्या मोबाईल क्रमांकावर किंवा घरच्या पत्त्यावर ई -चलन पाठवण्यात येते, यासाठी टपाल खात्याचीदेखील मदत घेण्यात आली आहे. ई- चलनामुळे पारदर्शी कारभारासह वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या पैसे खाण्याच्या आरोपाला पूर्णविराम मिळाला आहे. यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी कमी झाली आहे. ई-चलनाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईच्या दंडाची रक्कम भरण्यासाठी अनेक पर्याय आहेत. व्होडाफोन गॅलरी, पे टीएम, ऑनलाईन सुविधा तसेच नजीकच्या वाहतूक शाखेत या दंडाची रक्कम भरू शकता. परंतु ई चलनाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दंडाची रक्कम वेळेत भरणार्‍याचे प्रमाण खूप कमी आहे.

त्यामुळे मागील अडीच वर्षात वाहन चालकांकडून न भरण्यात आलेल्या दंडाची रक्कम अब्जाच्या घरात गेली आहे. एका आरटीआय कार्यकर्त्याने माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीत जुलै २०१८ पर्यंत न भरलेल्या दंडाची रक्कम तब्बल १ अब्ज १८ कोटी 63 लाख 56 हजार 501 रुपये एवढी आहे. यामध्ये वाहतुकीचे सर्व प्रकारचे नियम मोडलेल्या वाहन चालकांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या रकमेची वसुली कशी करायची असा प्रश्न वाहतूक विभागाला पडला आहे.

शिस्त लावण्याचा उद्देश
केवळ दंड लावून त्याची वसुली करणे हा वाहतूक विभागाचा उद्देश नसून वाहन चालकांना शिस्त लागणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम तोडल्यास ई-चलन आपल्या घरी येऊ शकते. या भीतीने वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळतो. प्रत्येकाने वाहतुकीचा नियम पाळावा हा ई-चलनाचा खरा उद्देश आहे.

सेवानिवृत्त वाहतूक पोलीस अधिकारी
वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकासोबत नेहमी वाहतूक पोलिसांचा वाद होत असे. तसेच वाहतूक पोलिसांवर चिरीमिरी घेत असल्याच्या आरोपामुळे संपूर्ण वाहतूक पोलीस यंत्रणा बदनाम झाली होती. मात्र ई-चलनामुळे पारदर्शी कारभार होऊन वाहतूक पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारत आहे. तसेच वाहन चालकासोबत होणारे सततचे वाद संपुष्टात आले आहेत. परिवहन विभागात आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर नसेल किंवा ज्या वाहन चालकाने ट्रॅफिक पोलिसांचे अ‍ॅप डाऊनलोड केलेला नसेल अशा वाहन चालकाला आपल्यावरील दंडाची माहिती मिळत नाही, असा वाहन चालक वाहतूक पोलीस शाखेत जाऊन आपल्या दंडाची रक्कम तपासू शकतो किंवा स्मार्ट फोन असल्यास त्याच्यावर मुंबई पोलीस वाहतूक विभागाचे अ‍ॅप डाउनलोड करून आपली दंडाची रक्कम बघू शकतो.

नवीन योजना
मुंबई वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या तसेच नो पार्किंगमध्ये पार्क करण्यात आलेल्या वाहन चालकांना ऑक्टोबर २०१६ ते जून २०१८ पर्यंत २८ लाख ६२ हजार 102 एवढी ई-चलन पाठवण्यात आली. त्याचा दंड बाकी आहे. या ई-चलनातून येणार्‍या रकमेचा आकडा १अब्ज १८ कोटी 60 लाख 56 हजार 501 एवढा आहे. हा दंड वसूल करण्यासाठी वाहतूक विभागाकडून काही योजना आखल्या जात असल्याचे समजते.

वाहतूक नियम मोडणार्‍यांकडून
१18 कोटी वसूल करण्यात अपयश

मुंबई वाहतूक पोलिसांकडून आकारण्यात आलेले चलन

वर्ष एकूण          आकारण्यात आलेला दंड                भरलेली रक्कम         शिल्लक रक्कम
२०१६              (ऑक्टोबर-डिसेंबर) ८,०८,६५,७०९     २,८४,९५,५०९        ५,२३,७०,२००
२०१७              ७९,४१,६६,१०१                            ३७,६५,४९,७००        ४१,७६,१६,४०१
२०१८              ८४,९४,१७,५९०                            १३,३०,४७,६९०        ७१,६३,६९,९००
एकूण              १७२,४४,४९,४००                           ५३,८०,९२,८९९       ११८,६३,५६,५०१

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here