घरमुंबईभातसा धरणाची तीन भूकंप मापन यंत्रे भंगारात पडून

भातसा धरणाची तीन भूकंप मापन यंत्रे भंगारात पडून

Subscribe

भूकंपप्रवण क्षेत्रातील भयंकर वास्तव उजेडात

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून बसविण्यात आलेली 3 भूकंपमापन यंत्र बंद पडली आहेत. ही बंद पडलेली यंत्र भंगारात पडून असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. सध्यस्थितीत धरण क्षेत्रात भूकंपमापन यंत्रच अस्तित्वात नसल्याने भातसा धरणाची सुरक्षा आता धोक्यात सापडली आहे.

भातसा धरण क्षेत्रात व परिसरातील खर्डी, वाशाळा, लाहे येथे 1984 ते 85 सालाच्या काळात बसविण्यात आलेल्या भूकंपमापन यंत्राना 30 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने ही भूकंपमापन उपकरणे आता जुनी व कालबाह्य झाल्याने नादुरुस्त अवस्थेत होती. यातील एक भुकंपमापन केंद्र भातसा धरण प्रकल्प वसाहती जवळ कार्यरत होते. मात्र हे भूकंपमापन यंत्र देखील दुरुस्ती अभावी पाच महिन्यांपूर्वीच बंद पडले आहे. भातसानगर, वाशाळा, लाहे अशी 3 नादुरुस्त व बिघाड झालेली भूकंपमापन यंत्रे बंद पडलेली आहेत. ही यंत्रे बंद पडण्यापूर्वी भातसा धरण क्षेत्रातील नादुरुस्त झालेली भूकंपमापन यंत्र वेळीच बदलणे गरजेचे आहे. येथे आता डिजिटलाइज व अद्ययावत भूकंपमापन यंत्र बसविणे गरजेचे होते. परंतु, जलसंपदा विभागाच्या लालफितीच्या कारभारामुळे व अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे येथील तीनही भूकंपमापन यंत्रे अखेर बंद पडली आहेत.

- Advertisement -

धरण परिसरात ज्याठिकाणी यातील एक भूकंपमापन यंत्र बसविले होते. त्या इमारतीची आता पडझड झाली आहे. यंत्र बसविण्यात आलेल्या या इमारतीच्या खोलीचे लोखंडी दरवाजे, खिडक्या, चोरीला गेल्या असून बाहेरील छत देखील कोसळलेल्या अवस्थेत आहे. दरवाजे नसल्याने या खोलीत उंदीर, घुशी, कुत्री, मोकाट जनावरे यांनी मुक्काम ठोकला आहे. येथे बंद पडलेले भूकंपमापन यंत्र देखील गायब झाले असून याचा थांगपत्ताही भातसा धरण कार्यालयाला नाही. याबाबत मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे. अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे अतीसंवेदनशील असलेल्या भातसा धरणालगत होणार्‍या भूगर्भागातील हालचालींवर लक्ष ठेवणारी भूकंपमापन यंत्राणाच येथे अस्तित्वात राहिली नसल्याचे वास्तव आहे.

भातसा धरण क्षेत्रालगत असलेल्या खर्डी व परिसरात 1982 च्या काळात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळेस भूकंपाच्या भीतीने घाबरलेल्या खर्डी, लाहे, भातसानगर या परिसरातील गाव पाड्यांंतील नागरिकांनी सुरक्षेच्या ठिकाणी अन्य शहर व गावात स्थलांतर केले होते. यामुळे हे क्षेत्र भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. खर्डी पासून अगदी हाकेच्या अंतरावर भातसा जलाशय आहे. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील भूकंपमापन यंत्रणाच मृत अवस्थेत असल्याने धरण व परिसरातील गाव खेड्यांची सुरक्षा धोकादायक सापडली आहे.

- Advertisement -

भातसा धरण क्षेत्रात तातडीने भूकंपमापन यंत्र बसविण्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअर रिसर्च इन्स्टिट्यूटकडे आम्ही पत्रव्यवहार केला असून भातसा धरण व परिसरात एकूण 7 भूकंपमापन यंत्रे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
– योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, भातसा जलसंपदा विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -