भूकंपरोधक घरांची निर्मिती करणार – पालकमंत्री दादा भुसे

dada bhuse
दादा भुसे

पालघर जिल्ह्यात डहाणू आणि तलासरी तालुक्यात भूकंपाचे सतत धक्के बसत असून भूकंपग्रस्त भागाला तातडीने मदत करण्यात येईल. भूकंपाच्या तीव्रतेचा परिणाम कमी करण्यासाठी तज्ञांची मदत घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. तसेच भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरे तयार करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

भुसे यांनी भूकंपग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी गावात जाऊन त्यांनी भूकंपग्रस्त घरांची पाहणी केली व त्यांच्या समस्या जाणून घेतली. भूकंपग्रस्त भागाची पाहणी केलेला अहवाल तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे सादर करून तातडीच्या उपाययोजना तसेच कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येतील. शासनाच्या वतीने भरीव मदत केली जाईल, असेही भुसे यांनी यावेळी सांगितले.

धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पीटलला भेट देऊन तेथे दाखल असलेल्या कोविड रुग्णांची भुसे यांनी भेट घेतली. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या भूकंपावर करण्यात येणार्‍या या पुस्तिकेचे विमोचन भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मुख्यमंत्र्यांनी सुुरु केलेल्या उपक्रमात सर्वांनी आपल्या गावाकडे आपले कुटुंब म्हणून पाहिले पाहिजे. आपली जबाबदारी समजून त्याची काळजी घेतली पाहिजे. या योजनेत अधिकारी-कर्मचार्‍यांची टीम तयार करून सदस्यांची तपासणी करुन घ्यायची आहे. ही तपासणी कोविडपुरती मर्यादीत न राहता कुठलेही आजाराचे निदान यातून करता येणार आहे. त्यातून सुदृढ नागरीक निर्माण करण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेेने या योजनेचा लाभा घ्यायचा आहे, असे आवाहन भुसे यांनी यावेळी केले.

भूकंपग्रस्त भागात निवारा स्थळ बनवणे गरजेचे आहे. जुन्या शाळांना धक्का बसल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती आमदार सुनील भुसारा यांनी यावेळी व्यक्त केली. तर भूकंपामागील शास्त्रीय कारण प्रशासनाने शोधून काढले पाहिजे, अशी मागणी जिप अध्यक्ष भारती कामडी यांनी यावेळी केली. आमदार श्रीनिवास वनगा, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिपचे मुख्य कार्यकारी  अधिकारी महेंद्र वारभुवन आणि प्रकल्पाधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होते.


हे ही वाचा – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणा यांची मागणी