घरताज्या घडामोडीवर्षा राऊत यांना पुन्हा एकदा ईडीचा समन्स

वर्षा राऊत यांना पुन्हा एकदा ईडीचा समन्स

Subscribe

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावला असून ११ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही वर्षा राऊत यांना 5 जानेवारी रोजी ईडीने समन्स बजावले होते.पण, त्याआधीच म्हणजे 4 जानेवारी रोजी वर्षा त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. खुद्ध वर्षा राऊत यांनीच ईडी कार्यालयात जाऊन चौकशीला सहकार्य केले होते. चार तास त्या या ईडी कार्यालयातच होत्या. परंतु, त्यावेळी चौकशी पूर्ण न झाल्यामुळं ईडीने पुन्हा एकदा वर्षा राऊत यांना समन्स बजावले असल्याचं समोर येतेय. पीएमसी बँकेतील घोटाळ्याच्या तपासासंबधित वर्षा राऊत यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली.

पीएमसी बँकेतील घोटाळ्याला हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ही कंपनी जबाबदार आहे. गुरुआशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही एचडीआयएलची उप कंपनी आहे. प्रवीण राऊत याच कंपनीत संचालक होते. संचालक असताना त्यांनी एचडीआयएलच्या खात्यातून १.६० कोटी रुपये पत्नी माधुरी यांच्या खात्यात वळवले. माधुरी यांनी याच १.६० कोटी रुपयांपैकी ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांना व्याजमुक्त कर्ज म्हणून दिले. त्या रक्कमेतून वर्षा यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. या सर्व घडामोडी २०१०-११ दरम्यान घडल्या. पुढे एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ६,६७० कोटी रुपयांचे कर्ज बुडवले. त्यातून पीएमसी बँक कोसळली. याचाच तपास ईडीकडून केला जात आहे. त्यामुळे प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध आहेत. त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. त्याच संशयाच्या आधारे चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी नोटिस बजावली होती. मात्र, त्यांनी ईडीकडे पत्र सादर करत चौकशीसाठी मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -