राज्यात २४ तासात दोन पोलीस अधिकार्‍यांसह ८ जणांचा मृत्यू ,मृतांची संख्या झाली २०२

Police death corona
महाराष्ट्र पोलीस

कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरून कोरोनासोबत लढणार्‍या राज्य पोलीस दलातील ८ पोलिसांचा मागील २४ तासात मृत्यू झाला आहे. यात दोन अधिकार्‍यांचा समावेश असून संपूर्ण राज्यभरात आतापर्यंत २०२ पोलिसांचा कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यभरात पोलिसांमध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आजही अहोरात्र काम करणार्‍या पोलीस दलात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बंदोबस्त, नाकाबंदी तसेच लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची जबाबदारी, ई-चलन या सर्व जबाबदार्‍या चोखपणे पार पाडणार्‍या पोलीस दलावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. मागील २४ तासात राज्यभरात ८पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यात दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यभरात २०२ पोलीस कोरोना या आजाराशी लढताना शहीद झाले असून त्यात २० अधिकारी यांचा समावेश आहे.

राज्यभरात १९हजार ७५६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये २१४२ अधिकार्‍यांचा समावेश आहे, यापैकी १६६२ अधिकार्‍यांसह १५८३० पोलीस बरे होऊन घरी परतले असून ४६०अधिकार्‍यांसह ३७२४ पोलीस कोरोनाशी झुंज देत आहेत.

सध्या राज्यभरात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढल्यामुळे पोलिसांवरील ताण अधिकच वाढला आहे. पोलिसांवर नाकाबंदी सक्ती करण्यात आल्यामुळे नाकाबंदीच्या दरम्यान पोलीस हा वाहनचालकांच्या संपर्कात येत असल्यामुळे पोलीस दलात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस दलात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.