घरमुंबईनिवडणूक आयोग साडेचार हजार दिव्यांग मतदारांच्या संपर्कात

निवडणूक आयोग साडेचार हजार दिव्यांग मतदारांच्या संपर्कात

Subscribe

नाव नोंदणीसाठी मेसेज पाठविण्याचे आवाहन

लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे सुलभ व्हावे, यासाठी निवडणूक आयोग मुंबई उपनगरातील साडेचार हजार दिव्यांगांच्या संपर्कात आहे. निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी विशेष वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींसोबत समन्वय साधण्यासाठी वांद्रेमधील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दिव्यांग मतदार मदत केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने यंदा ‘दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य निश्चित केले आहे. त्यानुसार दिव्यांग मतदारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचीही तयारी सुरू आहे. दिव्यांग मतदार मदत केंद्रामार्फत दिव्यांग मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. मुंबईतील साडेचार हजार दिव्यांगांचे दूरध्वनी निवडणूक आयोगाकडे असून, त्यांच्याशी समन्वय साधण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

दिव्यांग मतदारही आवश्यकतेनुसार केंद्रांशी संपर्क साधू शकणार आहेत. केंद्राद्वारे दिव्यांग मतदारांशी संपर्क साधून त्यांना प्रशासनामार्फत मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोफत वाहन सुविधेच्या नोंदणीसाठी दिव्यांग मतदारांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी दिव्यांग मतदाराचे नाव, त्यांचा मतदार क्रमांक व लोकसभा मतदारसंघ क्रमांक आदी तपशील दूरध्वनी करून किंवा मेसेज किंवा व्हाट्सअ‍ॅपद्वारे कळवल्यास मतदानाच्या दिवशी त्यांना घेण्यासाठी येणार्‍या वाहनाचा क्रमांक व वेळ ही दिव्यांगांच्या भ्रमणध्वनीवर मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे.

मतदानासाठी हेल्पलाईन क्रमांक
दिव्यांग मतदारांना निवडणूक विषयक शंकांचे निरसन करण्यासाठी मदत केंद्रातील स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. दिव्यांग मदत केंद्राच्या ९८६९५१५९५२, ८६५५२३५७१४ आणि ०२२२६५१००२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

- Advertisement -

व्हील चेअर, डोलीची विशेष सुविधा
मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग तसेच डोली आदी सुविधादेखील असणार आहेत. मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जागृती मोहीमही राबविली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -