गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाचा नव्या सूचना

उमेदवाराला तीन वेळा गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मतदारांसाठी प्रसिद्ध करावी लागणार

ELECTIONCOMMISSION

भारतीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांमार्फत उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करण्याच्या अनुषंगाने एक महत्वपुर्ण बैठक नुकतीच आयोजित केली होती. या बैठकीत निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी अधिक स्पष्ट करण्याचा निर्णय़ भारतीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. लोकशाहीच्या सर्वांगिण विकासासाठी आणि उन्नतीसाठी या नैतिक बाबीवर जोर देत असल्याचे निवडणूक आयागाने स्पष्ट केले आहे. निवडणूक कालावधीत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून तीन वेळा उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी जाहीर करावी लागणार आहे. चांगला उमेदवार निवडीसाठी उमेदवारीची सर्वतोपरी माहिती असणे आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाचे मत आहे. म्हणूनच निवडणूकीदरम्यान राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करण्याचे वेळापत्रक पाळावे लागणार आहे.

निवडणुक लढवणाऱ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या बाबतीत याआधीच १० ऑक्टोबर २०१८ आणि ६ मार्च २०२० रोजी झालेल्या सूचनांच्या अनुषंगाने नुकतीच ११ सप्टेंबर रोजी एक बैठक पार पडली. या बैठकीत आधीच्या सूचनांवरही तपशीलवार चर्चा झाली. निवडणूक कालावधीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती जाहीर करण्याबाबत निवडणूक आयोगाने एक वेळापत्रक आखले आहे. महत्वाचे म्हणजे ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा उमेदवारांना वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर हा तपशील जाहीर करायचा आहे.

असे आहे वेळापत्रक

प्रथम प्रसिद्धी – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या ४ दिवसांमध्ये
दुसरी प्रसिद्धी – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या ५ व्या ते ८ व्या दिवसांमध्ये
तिसरी प्रसिद्धी – ९ व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत ( म्हणजे मतदान होण्याच्या २ दिवस आगोदर)

Election commission of India

हे वेळापत्रक मतदारांना त्यांच्या निवडीचा अधिकारी चांगल्या माहितीच्या आधारे उपयोगात आणण्यात मदत करेल असा निवडणुक आयोगाचा विश्वास आहे. महत्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाने बिनविरोध विजयी उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील प्रसिद्ध करण्याची अट घातली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या सूचना तत्काळ अशा अंमलात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांमध्ये या गोष्टींचे पालन करणे राजकीय पक्ष आणि उमेदवार या दोघांसाठीही बंधनकारक असेल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.