Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई अकरावी प्रवेशाची एफसीएफएस फेरी ७ टप्प्यात

अकरावी प्रवेशाची एफसीएफएस फेरी ७ टप्प्यात

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन यंदा प्रथम येणार्‍या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी सात टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे.

Related Story

- Advertisement -

अकरावीच्या प्रवेशाच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेर्‍या राबवण्यात आल्यानंतरही अकरावीचे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन यंदा प्रथम येणार्‍या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी सात टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत राबवलेल्या पाच फेर्‍यांमधून मुंबई विभागातून १ लाख ९६ हजार १३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, १ लाखाहून अधिक जागा रिक्त आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचा अजूनपर्यंत कोणत्याही महाविद्यालयांत प्रवेश मिळाला नाही, असे सर्व विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. ही फेरी सात टप्प्यात राबवण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ९० ते १०० टक्के प्राप्त विद्यार्थी, दुसर्‍या टप्प्यात ८० ते १०० टक्के, त्यानंतर ७० ते १०० टक्के, ६० ते १०० टक्के, ५० ते १०० टक्के त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फेरी राबवण्यात येणार असून, त्यानंतर एटीकेटी सवलतधारक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. या फेरीत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रवेश घ्यायचा असलेले कनिष्ठ महाविद्यालय, रिक्त जागांची माहिती, तेथील कट ऑफ या सगळ्याची माहिती आधीच घेणे आवश्यक असणार आहे. या फेरीदरम्यान एखादे महाविद्यालय विद्यार्थ्याने चुकून निवडले असल्यास, त्याला तेथे प्रवेश घ्यायचा नसल्यास तो ते रद्द करून दुसरे महाविद्यालय निवडू शकणार आहे. जे विद्यार्थी अद्यापही प्रक्रियेमध्ये समविष्ट नाहीत त्यांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालय व शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

असे असणार एफसीएफएस फेरीचे टप्पे

          गुण                                  प्रवेशाची तारीख
  • ९० ते १०० टक्के                    १३ ते १५ जानेवारी
  • ८० ते १०० टक्के                    १६ ते १८ जानेवारी
  • ७० ते १०० टक्के                    १९ ते २० जानेवारी
  • ६० ते १०० टक्के                    २१ ते २२ जानेवारी
  • ५० ते १०० टक्के                    २३ ते २५ जानेवारी
  • उत्तीर्ण विद्यार्थी                      २७ ते २८ जानेवारी
  • उत्तीर्ण विद्यार्थी,
    एटिकेटी सवलतीधारक विद्यार्थी    २९ ते ३० जानेवारी
- Advertisement -