कोरोनामध्ये ८५ हजार बेरोजगारांना रोजगार

ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे ८५ हजार ४२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Job

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे ८५ हजार ४२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने httpps://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित रोजगार मेळाव्यांमुळे राज्यातील ८५ हजार ४२८ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला. ‘रोजगार महास्वयंम’ या पोर्टलवर सप्टेंबरमध्ये ६३ हजार ५९३ इतक्या इच्छूक उमेदवारांनी नोकरीसाठी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात २७ हजार २५२, नाशिक विभागात ६ हजार ६४४, पुणे विभागात ११ हजार ६८१, औरंगाबाद विभागात ९ हजार १६१, अमरावती विभागात ५ हजार ००९ तर नागपूर विभागात ३ हजार ८४६ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे सप्टेंबरमध्ये ३२ हजार ९६९ उमेदवारांना नोकरी मिळाली. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक २० हजार ८०५, नाशिक विभागात २ हजार २४४, पुणे विभागात ४ हजार १८७, औरंगाबाद विभागात ३ हजार १२८, अमरावती विभागात १ हजार २९३ तर नागपूर विभागात १ हजार ३१२ इतके बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळाली. सप्टेंबरमध्ये ३२ हजार ९६९ बेरोजगारांना रोजगार मिळाला. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान १ लाख १७ हजार ८४३ बेरोजगारांना रोजगार मिळाला, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये १११ रोजगार मेळावे

कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोहीम सुरु केली आहे. एप्रिल ते सप्टेंबरमध्ये १११ ऑनलाईन रोजगार मेळावे झाले. सप्टेंबरमधील ३५ मेळाव्यांमध्ये २३६ उद्योजकांनी सहभागी झाले. त्यांच्याकडील १६ हजार ६८३ जागांसाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप, स्काईप, झूम अ‍ॅपच्या सहायाने ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये ९ हजार ८५६ नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार ९३६ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे.

तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

रोजगार उपलब्धतेसाठी तरुणांनी httpps://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.