एईएमएलच्या कामगारांना संपावर जाण्यापासून मज्जाव

ऊर्जा विभाग आणि औद्योगिक न्यायालयाचा आदेश

adani-electricity-
अदानी इलेक्ट्रिसिटी

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या कामगारांनी संपावर जाऊ नये असे ऊर्जा विभागाने एका आदेशान्वये आज स्पष्ट केले. वीज पुरवठा करणारी अत्यावश्यक सेवा म्हणून या कंपरनीच्या कामगारांना संप करण्यास प्रतिबंध करणारा आदेश ऊर्जा विभागाद्वारे देण्यात आला आहे. सार्वजनिक हितासाठी आवश्यक म्हणून या ऊर्जा सेवा देणाऱ्या कंपनीतील कामगारांनी संपावर जाऊ नये असा पवित्रा ऊर्जा विभागाने घेतला आहे. तसेच औद्योगिक न्यायालयानेही अंतरीम आदेश देत संप करण्यासाठी मज्जाव केला आहे. मुंबई इलेक्ट्रिसिटी वर्कर्स युनियनने ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता.

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईत बेमुदत संपाची हाक दिली होती. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यातच कर्मचाऱ्यांकडून धरणे आंदोलन करण्यात येत होते. आपल्या विविध मागण्यांची पुर्तता न झाल्यानेच कामगारांनी हे संपाचे हत्यार उपसू असा इशारा याआधीच दिला होता. मुंबई इलेक्ट्रिसिटी वर्कर्स युनियनकडून ५ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू आहे. तर तर प्रलंबित मागण्यांची पुर्तता न झाल्यास ८ ऑक्टोबर मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले जाईल असे मुंबई इलेक्ट्रिसिटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले होते. एईएमएल मुंबई उपनगरातील ३० लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा करते. पण ऊर्जा विभाग आणि औद्योगिक न्यायालयाच्या आदेशान्वये ता संपावर जाता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे.