व्हिडिओ कॉलवर तरुणीला अश्लील कृत्य करण्यास सांगितले; इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याला अटक

student leaked girls private photos
प्रातिनिधिक छायाचित्र

खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीची बदनामी तसेच तिचा विनयभंग केल्याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगच्या पदवीधर मित्राला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अक्षय आनंदा पवार असे या मित्राचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी बोरिवली पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. बोरिवली येथे २३ वर्षांची तक्रारदार तरुणी राहते. काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाने इंस्टाग्रामवर बोगस अकाऊंट सुरु करुन तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसेच तिला व्हिडीओ कॉल करुन अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून तिचा विनयभंग केल होता.

या घटनेनंतर पीडित मुलीने बोरिवली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांत बोरीवली पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी तपास करीत होते. या पथकाने बोगस इंस्टाग्राम अकाऊंटची तांत्रिक माहिती प्राप्त करुन त्याचे विश्लेषन केले. त्यानंतर कळवा येथून अक्षय पवार या २३ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तक्रारदार तरुणी आणि अक्षय एकमेकांच्या परिचित आहेत. या दोघांनी एकत्र शिक्षण घेतले होते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या मित्रांसोबत काही खासगी फोटो काढून ते तिच्या मेलवर सेव्ह करुन ठेवले होते. तिचा मेल आणि पासवर्ड प्राप्त करुन अक्षयने ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला व्हिडिओ कॉल करुन अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त केले होते.

पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस हवालदार नितीन शिंदे, अजय कदम यांनी तांत्रिक माहितीवरुन या आरोपीला अटक करुन या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. ही तरुणी फोटोमध्ये त्याच्या दुसर्‍या मित्रांसोबत होती, त्याचा त्याच्या मनात राग होता. त्यातून तिला बदनाम करण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून तो मोबाईल फॉन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांत गुन्हा दाखल असल्याने त्याला पुढील चौकशीसाठी त्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.