पावसाळ्यासोबत आले साथीचे आजार

पावसाळ्यासोबत आता साथीच्या आजारांनी देखील डोकं वर काढलं आहे.

Mumbai
epidemic diseases also come with rain
पावसाळ्यासोबत आले साथीचे आजार (फोटो प्रातिनिधिक)

मुंबईत सध्या तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर सरींचा अनुभव घ्यायला मिळत आहे. या वातावरणाच्या बदलांमुळे सामान्यांना आरोग्यविषयीच्या अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. दरम्यान, पावसाळ्यासोबत आता साथीच्या आजारांनीही डोकं वर काढलं आहे. चिखल, साचलेलं पाणी अशा अस्वच्छ परिसरात साथीच्या आजारांचा जोर वाढतच जातो. गेल्या काही दिवसांत सर्दी, खोकला आणि साधा ताप या आजारानीच नाही तर मलेरिया, डेंग्यू अशा जीवघेण्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. तर, ही परिस्थिती फक्त मुंबईतच नाही तर राज्यातही पाहायला मिळत आहे.

पावसाळ्यातील वातावरण साथीच्या आजारांच्या जीवाणूंसाठी पोषक

सध्या मलेरियाच्या रुग्णांमुळे हॉस्पिटल्स भरलेली आहेत. पण, मलेरियापेक्षा तापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस अशा अनेक आजारांमध्ये ताप येतो. प्रत्येक आजाराप्रमाणे त्याची लक्षणं वेगवेगळी असतात. पावसाळ्यातील वातावरण साथीच्या आजारांच्या जीवाणूंसाठी पोषक असते. याच ऋतूत पाण्याचेही प्रदूषण वाढते. डासांचे प्रमाण वाढते. अशुद्ध पाणी आणि डास या आजारांची उत्पत्तीस्थाने आहेत. सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. लहान मुले आणि प्रौढांमध्ये त्याची लागण झाली असून रुग्ण हॉस्पिटल्समध्ये दाखल होत आहेत.

स्वाईन फ्लुचे १६, टायफॉईडचे ४ मलेरियाचे २, कावीळचे २ रुग्णांची नोंद

चेंबुरच्या झेन हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अशा प्रकारचे रुग्ण दाखल होत आहेत की ज्यात डेंग्युसदृश्य लक्षणांपैकी रुग्णाला ताप नसतानाही घसा दुखणे, श्वास घेण्यास अडचणी निर्माण होणे अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये १० डेंग्यु संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. तर, स्वाईन फ्लुचे १६, टायफॉईडचे ४ मलेरियाचे २, कावीळचे २ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जनरल फिजिशियन डॉ. निर्मलदत्त ठाकूर यांनी सांगितलं की, ” डेंग्यु सारख्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.”

राज्यातही पसरले साथीचे आजार

यावर्षी जानेवारी महिन्यापासून राज्यात डेंग्यूचे ८५० रुग्ण आढळले असून त्यातील जून महिन्यात २०० रुग्णांचे निदान झाले आहे. तर, डेंग्यूमुळे दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यापर्यंत ७ लाख २८ हजार ९१३ डेंग्यूसदृश्य रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना साथीचे रोग नियंत्रण कक्षाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, “यंदा राज्यात लेप्टोच्या ३६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील २५ मुंबई शहर-उपनगरातील आहेत. तर अन्य रुग्ण सिंधुदूर्ग, भिवंडी आणि पुणे येथील आहेत. मलेरियाचे १ हजार ७५७ रुग्ण राज्यात आढळले आहेत. ग्रामीण भागातील ४०० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, शहरात १ हजार १९० रुग्णांची नोंद आहे. मुंबईत १ हजार १ रुग्ण मलेरियाचे आढळले आहेत.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. लहान मुलांचा डासांपासून बचाव करण्यासाठी उत्पादनांचा वापर करणे आवश्यक आहे. खोकला, ताप, पोटदुखी, अंगदुखी यांसारखे आजार अंगावर काढू नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर आणि घर स्वच्छ असणं हे गरजेचं आहे. अस्वच्छतेत रोगजंतूची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे कुटुंबाचं आरोग्य टिकवण्यासाठी ही खबरदारीही महत्त्वाची आहे. पावसाळ्याच्या काळात पचनशक्ती क्षीण झालेली असते. खाण्यापिण्याबाबत या काळात काही पथ्य पाळणं आवश्यक बनतं. प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे आपलं शरीर अनेक आजारांचं आश्रयस्थान बनू शकतं. त्यामुळे या काळात पालेभाज्या, फळभाज्या खाल्ल्या पाीहजेत. हे अन्न पचायलाही हलकं असतं आणि शरीराला यातून आवश्यक पोषण मिळत असल्यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही वाढते. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.


हेही वाचा – प्रतिकारशक्ती वाढवा, साथीचे रोग टाळा!