रुग्णांप्रमाणे डॉक्टरांनाही समजून घ्या – डॉक्टरांचा जाहीरनामा

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स  या संघटनेकडून रूग्ण-डॉक्टर यांच्या नात्यावरील जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. डॉक्टर आणि रुग्णांमधील वाढत चाललेली दरी कमी करण्यासाठी आणि ढासळत असलेला विश्वास पुन्हा घट्ट  करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.

Mumbai
doctor

सध्या डॉक्टर आणि रुग्णांमध्ये योग्य पद्धतीने संवाद होत नसल्याकारणाने अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण केली जाते. पण, सतत होणाऱ्या वादामुळे या सर्व परिस्थितीवर आता चर्चा होणं गरजेचं असून रुग्णांसोबत डॉक्टरांचेही ऐका, त्यांनाही समजून घ्या असे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स या डॉक्टरांच्या संघटनेचे म्हणणे आहे.

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स  या संघटनेकडून रूग्ण-डॉक्टर यांच्या नात्यावरील जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. डॉक्टर आणि रुग्णांमधील वाढत चाललेली दरी कमी करण्यासाठी आणि ढासळत असलेला विश्वास पुन्हा घट्ट  करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. प्रसिद्ध बेरिअट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर आणि ‘द एस्थेटिक्स क्लिनिक्सचे’ संचालक डॉ. देबराज शोम यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ‘डिअर पीपल, विथ लव्ह अण्ड केअर, युवर डॉक्टर्स’ या पुस्तकात हा जाहीरनामा समाविष्ट करण्यात आला आहे. जुलै २०१९  मध्ये हे पुस्तक प्रकाशित होईल. तर ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंट्स’ या डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.या जाहीरनाम्यात रुग्ण आणि डॉक्टरांचे हक्क देण्यात आले आहेत. तसेच, कठीण प्रसंगी डॉक्टर आणि रूग्ण या दोघांची वर्तणूक संहिता यात देण्यात आली आहे.

याविषयी ‘द एस्थेटिक्स क्लिनिक्सचे’ संचालक डॉ. देबराज शोम यांनी सांगितलं,  ‘‘रुग्णांना डॉक्टरांकडून जशा अपेक्षा असतात, त्याचप्रमाणे डॉक्टरांनाही रुग्णांकडून सहकार्याची अपेक्षा असते. पण, गेल्या काही वर्षांपासून रुग्ण-डॉक्टरांचं तुटत चाललेलं नातं जोडणं हा या जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश आहे. या जाहीरनाम्यात रुग्ण आणि डॉक्टरांचे हक्क अधोरेखित करण्यात आले आहेत. ’’

 ” काही घटनांमधून देशात डॉक्टरांविरुद्ध लढा सुरू झाल्यासारखे वाटू लागले आहे. अनेक घटक कारणीभूत असले तरीही रूग्ण-डॉक्टर नात्यांमधील वादाचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक आहे. डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन मारहाण केली जाते. या दोघांमधील वाढत्या तणावाचं कारणं शोधून त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. या अनुषंगानं रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नातं घट्ट व्हावं, यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. ’’- डॉ. अपर्णा गोविल भास्कर,बेरिअॅट्रिक सर्जन

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंट्स या संस्थेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर म्हणाले की, ‘‘रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नाते पूर्वीसारखे करण्यासाठी दोघांमध्ये परस्पर संवाद साधण्याची अत्यंत गरज आहे. यासाठी हा जाहीरनामा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्या पारदर्शक संवाद झाला पाहिजे. तरंच दोघांचा एकमेकांवरील विश्वास वाढेल. असोसिएशनद्वारे आम्ही सर्व खासगी डॉक्टरांना याबाबत जागरूकता निर्माण करणार आहोत. हा जाहीरनामा केवळ खासगी नव्हे तर सरकारी डॉक्टरांनासुद्धा लागू व्हावा, यासाठी लवकरच हा जाहीरनामा राज्य सरकारला सादर केला जाईल. ’’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here