माजी मंत्र्यांना बंगले सोडवेनात; ४ बंगल्यांत अजूनही वास्तव्य!

राज्यात नवे सरकार आल्यानंतर देखील अजूनही माजी मंत्र्यांनी बंगले रिकामे केले नसल्याची बाब समोर आली आहे.

Mumbai
Uddhav Thackeray Government Cabinet

राज्यात आता नव्या सरकारने आपले कामकाज सुरु केले असले तरी अद्याप काही मंत्र्यांचा बंगल्यांचा तिढा कायम असल्याचे समोर आले आहे. कारण महायुतीच्या काळातील काही मंत्र्यांनी अद्याप आपला बंगला रिकामी केला नसल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ जणांना नोटीस पाठवल्यानंतरही अद्याप चार ते पाच जणांनी बंगले सोडले नसल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. त्यामुळे या मंत्र्यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवण्याचा विचार मंत्रालय पातळीवर सुरु झाला असल्याची माहिती गुरुवारी समोर आली आहे.

मुदतवाढ मिळणार नाही!

महाविकासआघाडीकडून सत्तास्थापन झाल्यानंतर तातडीने प्रशासनाने कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांसाठी मंत्रालयातील दालन आणि राहण्यासाठी बंगल्यांची घोषणा केली. त्यानुसार अनेक मंत्र्यांनी आपल्या बंगल्यांचा ताबा घेतला असून अनेकांनी नुतनीकरणाची कामे देखील सुरु केली आहेत. मात्र, ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना अद्याप त्यांचे बंगले मिळालेले नसल्याची बाब समोर आली आहे. कारण, महायुतीच्या काळातील अनेक मंत्र्यांनी त्यांचे बंगले रिकामे केलेले नाहीत. त्यामुळे आता या माजी मंत्र्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावली आहे. यामध्ये नऊ माजी मंत्र्यांचा समावेश असून, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगले खाली करण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये या मंत्र्यांना कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यास देखील नकार दिला असल्याची माहिती पुढे आली आहे.

देवगिरी, सातपुडा अजूनही ‘ऑक्युपाईड’!

दरम्यान, नोटीस पाठविण्यात आलेल्या ९ मंत्र्यांमध्ये भाजपसह शिवसेनेच्या माजी मंत्र्यांचा देखील समावेश होता. त्यानंतर अनेकांनी आपले बंगले रिकामे करून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द केले आहेत. मात्र, अद्याप चार मंत्र्यांनी आपले बंगले सोडले नसल्याची माहिती यावेळी मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. यात भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला मलबार हिल येथील देवगिरी हा बंगला सोडलेला नाही. तर शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांनी देखील त्यांना देण्यात आलेला सातपुडा हा बंगला सोडलेला नाही. या दोन बड्या नेत्यांबरोबर इतरही दोन मंत्र्यांनी अद्याप आपले बंगले सोडले नसल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता नव्या मंत्र्यांचा आपल्या बंगल्यात प्रवेश कधी होतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here