घरमुंबईपरीक्षा विदाऊट पेपर

परीक्षा विदाऊट पेपर

Subscribe

२०१९ पासून मिठीबाईची अभिनव संकल्पना विद्यार्थ्यांना टॅबवर मिळणार प्रश्नपत्रिका

परीक्षा पद्धतीत येणार्‍या त्रुटी दूर करण्यासाठी राज्यभरातील विद्यापीठे, कॉलेजांमध्ये परीक्षेच्या प्रक्रियेत गेल्या काही वर्षांपासून अनेक बदल करण्यात आले आहेत. ज्यात प्रामुख्याने प्रश्नपत्रिका कॉलेजांकडे ऑनलाईन पाठविण्याबरोबरच इतर अनेक बाबींचा समावेश आहे. पण यात आता अजून एक क्रांती घडविण्यात येणार आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी यापुढे विद्यार्थ्यांना टॅबवर प्रश्नपत्रिका पाठविण्याची नवसंकल्पना राबविण्याचा निर्णय विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजकडून घेण्यात आला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे मिठीबाई कॉलेजला काही दिवसांपूर्वीच ‘एक्सलन्स इन अ‍ॅकॅडमिक’ हा दर्जा देण्यात आला आहे. त्याअंतर्गत ही नवी संकल्पना राबविण्यात आली असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना परीक्षेत टॅबवरच प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या मदतीने ही संकल्पना कॉलेजमध्ये सुरू करण्यात येणार आहे. ही पद्धत सुरू करताना परीक्षेसाठी घेण्यात येणारी हजेरी ऑनलाईन घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजला नुकताच केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे स्वायत्तता दर्जा बहाल करण्यात आला आहे. तेव्हापासून कॉलेजतर्फे अनेक नवनवीन संकल्पना सुरू करताना परीक्षा पद्धतीतही अनेक बदल करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय कॉलेजकडून घेण्यात आले आहेत. स्वायत्तता दर्जा प्राप्त झाल्यानंतर कॉलेजने परीक्षा पद्धतीत अनेक बदल केले आहेत. त्यातच आता कॉलेजची विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे एक्सलन्स इन अ‍ॅकडमिक यासाठी निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत रूसातर्फे कॉलेजला कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा वापर करीत कॉलेजने तंत्रज्ञानाच्या पेपर विदाऊट पेपर ही संकल्पना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संकल्पनेत विद्यार्थ्यांनाच टॅबवर प्रश्नपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी बोर्डाच्या परीक्षेत मोबाइलवरुन प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणे, पेपरफुटीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वांची गंभीर दखल घेताना आणि कागदांचा वापर कमी करण्यासाठी कॉलेजने टॅबवर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कॉलेजकडून तब्बल दोन हजार टॅब विकत घेतले जाणार आहेत.

- Advertisement -

परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना हा टॅब देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या बैठक व्यवस्थेनुसार एक पासवर्ड देण्यात येणार आहे. हा पासवर्ड वापरुन या टॅबवर विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका पाहता येणार आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि हरित क्रांतीचा संदेश देत कागद वाचविण्यासाठी कॉलेजने हा निर्णय घेतल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

या प्रक्रियेनुसार विद्यार्थ्यांना ज्या टॅबमध्ये ही प्रश्नपत्रिका पाठविण्यात येणार आहे. तो वाय-फायवर जोडण्यात येणार आहे. विद्यार्थी केंद्रित असणार्‍या या टॅबची क्षमता ८ जीबी इंटरनल मेमरी इतकी असणार आहे. हा टॅब वजनास अत्यंत हलका असणार आहे. या टॅबमध्ये झूम आऊट आणि झूम इनची सुविधा देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका नीट पाहता येणार आहे. तर टॅबचा कॅमरा ५ एमपी तर फ्रंट कॅमरा २ एमपी इतका असणार आहे. याबरोबरच हा टॅब ऑटो अपडेट करण्याची सुविधाही देण्यात आल्याने विद्यार्थी केंद्रीत ही सुविधा असणार आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेमुळे पेपर छपाईच्या खर्चात २० टक्क्यांनी घट होणार असल्याने कॉलेज प्रशासनाला देखील त्याचा फायदा होणार आहे.

कशी चालणार ही प्रक्रिया

अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवर ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पेपर परीक्षा केंद्राच्या बाहेर नेणे शक्य होणार नाही. परीक्षा संपल्यानंतर दिलेला टॅब जमा करावा लागणार आहे. तर प्रश्नपत्रिका टॅबवर ओपन करण्यासाठी विद्यार्थ्यांना पासवर्ड देण्यात येणार आहे. हा पासवर्ड फक्त परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटे अगोदर दिला जाणार आहे. मोबाइलची बॅटरी पुरेशी नसल्यास सिस्टिमनुसार कॉलेजला मेसेज पाठवून परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच कल्पना देण्यात येणार आहे. एका टॅबवर फक्त एकदाच ही प्रश्नपत्रिका पाहता येणार असल्याने एकाच विद्यार्थ्याला ती पाहता येणार आहे. अनेक भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध असून वेळेची मर्यादा प्रक्रियेत नमूद करण्यात आली आहे.

मिठीबाई कॉलेज संलग्नीकरणातून स्वायत्ततेकडे परिवर्तित होत आहे. त्यामुळे आम्ही नवीन योजना अंमलात आणत आहोत, जेणेकरून शिक्षणाची नवी दालने निर्माण होतील. स्वायत्ततेमुळे गुणवत्ता हे प्रमाण असणार आहे.त्यामुळे विद्यार्थी चौकस व जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहेत. मिठीबाई कॉलेज परीक्षा आणि असेसमेंटवर सर्वात अधिक भर देत आहे. ही व्यवस्था कशी सुलभ, पारदर्शी व पर्यावरणपूरक होईल याचा विचार करून राबविण्याचा विचार आहे. ही संपूर्ण यंत्रणा अत्यंत कॉन्फिडेन्शिअल, फुल प्रूफ असणार तर आहेच परंतू हरितक्रांतीला पोषक असणार आहे.- डॉ.राजपाल हांडे, प्राचार्य, मिठीबाई कॉलेज

विद्यार्थी १२,०००
एकूण विभाग ३२
पदव्युत्तर विभाग १६
संशोधन केंद्र १०
एकूण परीक्षा ८७0

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -