परीक्षार्थींना लोकलमधून प्रवासाची मुभा

अंतिम वर्षांची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना रेल्वेकडून दिलासा

अंतिम वर्षांच्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मुंबईतील लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. त्यामुळे या परीक्षा देणारे विद्यार्थी, इतर स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी यांना लोकलने प्रवास करता येणार आहे.

या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. त्यानंतर रेल्वे बोर्डाकडून या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना आपले वैध आयकार्ड आणि हॉल तिकीट दाखवल्यानंतर मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे.

मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या तसंच स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओळखपत्र आणि हॉल तिकीटच्या आधारे विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.

विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर्स सुरू केली जाणार आहेत अशी माहितीही मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वेने इतरांना स्थानकांवर गर्दी करू नका, असे आवाहन करताना प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांनाही सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.