बायोमेट्रीक हजेरीतून महापालिका कर्मचाऱ्यांची सुटका

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बंधनकारकच

Mumbai
bmc bio metric attendance

महापालिका कर्मचाऱ्यांना सोमवारपासून लागू करण्यात आलेल्या बायोमेट्रीक हजेरीबाबतच्या निर्णयाबाबत कामगार, कर्मचाऱ्यांमधील घोळाला अखेर प्रशासनानेच पूर्णविराम दिला आहे. महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत बायोमेट्रीक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवू नये, असा फतवाच प्रशासनाने जारी केला आहे. मात्र, महापालिकेची प्रमुख रुग्णालये आणि आरोग्य खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांसाठी महापालिका प्रशासनाने बायोमेट्रीक हजेरीची सक्ती केली होती, त्याच कर्मचाऱ्यांना ही हजेरी बंधनकारक करून इतर कर्मचाऱ्यांची मात्र, यातून तुर्तास सुटका केली आहे.

महापालिका प्रशासनाने १ जुलै रोजी कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीसह सोमवारपासून सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्याबाबतचे परिपत्रक जारी केले होते. यानंतर सर्व कामगार संघटनांसोबत आयुक्तांनी केलेल्या चर्चेत बायोमेट्रीक हजेरीबाबत काही सवलत देत आयुक्तांनी हा निर्णय कायम राखण्याचा निर्धार केला हेाता. दरम्यान ७ जुलै रोजी याबाबत सुधारीत परिपत्रक सामान्य प्रशासनाने जारी केले. यावर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्वाक्षरी केली असून त्यामध्ये त्यांनी महापालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी यांनी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बायोमेट्रीक प्रणालीद्वारे हजेरी नोंदवू नये, असे नमुद केले आहे. परंतु महापालिकेची प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खात्यांच्या अंतर्गत असलेली रुग्णालये यामधील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांना बायोमेट्रीक पध्दतीनेच हजेरी नोंदवणे बंधनकारक असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना वगळता इतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी न नोंदवण्याची सवलत देणाऱ्या प्रशासनाने सर्व विभाग आणि खात्यांच्या आस्थापनांना बायोमेट्रीक मशीन सुस्थितीत आहेत, याची खात्री करावी आणि नादुरुस्त मशीन तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, असेही निर्देश दिले आहेत. मात्र १०० टक्के उपस्थितीचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे.

महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना प्रमाणपत्रांची गरज नाही

कोविड बाधित असलेल्या ज्या कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्याने महापालिकेच्या रुग्णालयात तसेच दवाखान्यात औषधोपचार घेतले असतील आणि त्यांना तिथून जे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले असेल तर अशा कर्मचाऱ्यांना महापालिका वैद्यकीय परीक्षणास पाठवण्यात येवू नये. त्यांना वैद्यकीय परीक्षणाशिवाय कार्यालयात हजर करून घ्यावेत, असेही निर्देश त्यांनी दिलेत. मात्र, हे वगळता यापूर्वी करण्यात आलेल्या परिपत्रकातील अन्य तरतुदींमध्ये कोणताही बदलल करण्यात आला नसल्याचे प्रशासनाने या परिपत्रकांत स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – सैन्य माघारीवरुन केलेल्या ‘त्या’ ट्विटवरुन कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींना घेरलं


दरम्यान, बायोमेट्रीक हजेरी रद्द करण्याच्या परिपत्रकाचे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने स्वागत केले आहे. बायोमेट्रीकमुळे कोरेानाचा संसर्ग वाढू शकतो म्हणून आम्ही त्याला विरोध केला होता, असे युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी स्पष्ट केले. तर म्युनिसिपल युनियनचे अध्यक्ष शशांक राव आणि सरचिटणीस रमाकांत बने यांनी हा कामगारांच्या एकजुटीचा निर्णय असल्याचे स्पष्ट केले. याबाबत आम्ही आंदोलन करण्याचा दिलेल्या इशाऱ्यामुळेच प्रशासनाने गुडघे टेकले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत उपस्थित एकाही कामगार संघटनांनी बायोमेट्रीकबाबत आक्षेप नेांदवला नव्हता. पण आम्ही पहिल्यादिवसापासून विरेाध दर्शवत होतो, असे सांगितले.