घरमुंबईफईम मचमचच्या राईट हँडला मुंबई विमानतळावर अटक!

फईम मचमचच्या राईट हँडला मुंबई विमानतळावर अटक!

Subscribe

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार फईम मचमच याच्या साथीदाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

फईम मचमच याचा खास सहकारी असलेल्या अहमद रझा वधारिया याला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दक्षिण मुंबईतील एका व्यापार्‍याला खंडणीसाठी धमकी दिल्याचा अहमदवर आरोप असून याच गुन्ह्यात त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अहमदने मुंबईसह गुजरातच्या अनेक व्यापार्‍यांकडे खंडणीची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील तक्रारदार दक्षिण मुंबईतील व्यापारी असून त्यांचा अन्य एका व्यापार्‍यासोबत भागीदारीमध्ये व्यवसाय सुरु होता. ते दोघेही चीन आणि दुबई येथून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणून त्याची मुंबईसह इतर शहरांत विक्री करत होते. काही वर्षांपूर्वी या दोघांमध्ये आर्थिक वाद निर्माण झाला होता. त्यातून त्यांनी भागीदारीचा करार मोडून टाकला होता. याच दरम्यान, तक्रारदार व्यापार्‍यांना फईम मचमचकडून खंडणीसाठी धमकी येत होती. या धमकीसह फईम मचमच सांगणार्‍या व्यक्तीने त्यांच्यातील व्यावसायिक वाद मिटवून दुसर्‍या व्यापार्‍याकडून पैसे मागू नये, अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी गुन्हे शाखेत तक्रार केली होती. या गुन्ह्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे होता. हा तपास हाती येताच ही धमकी फईम मचमचच्या नावाने त्याचा सहकारी अहमद याने दिल्याचे उघडकीस आले होते.


हेही वाचा – मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक

कसा सापडला अहमद?

अहमद सोमवारी दुबईतून मुंबईत आला. यावेळी त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर खंडणी विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. तपासात अहमद हा मूळचा गुजरातच्या सुरत शहराचा रहिवासी असून काही वर्षांपासून दुबईत वास्तव्यास होता. याच दरम्यान त्याचे फईम मचमचसोबत चांगले संबंध झाले होते, त्यानंतर तो फईमच्या सांगण्यावरुन मुंबईसह गुजरातच्या व्यापार्‍यांना खंडणीसाठी धमकी देत होता. तक्रारदारांना त्याने फईमच्या नावाने खंडणीसाठी धमकी दिली होती. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल जप्त केले असून या मोबाईलची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो सतत फईमच्या संपर्कात होता असेही तपासात उघडकीस आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -