घरमुंबईसरकारी टाय आणि गोत्यात पाय !

सरकारी टाय आणि गोत्यात पाय !

Subscribe

तोतया रेल्वे अधिकार्‍याला अटक

गळ्यात टाय घालून सुटाबुटात मिरवणे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यात जर का सरकारी अधिकार्‍याचा टाय मिळाला तर सोन्याहून पिवळे, पण हाच आनंद एका तरुणाच्या अंगाशी आला आहे. कचर्‍याच्या ढिगात सापडलेल्या सरकारी अधिकार्‍याच्या टायमुळे एका उच्चशिक्षित तरुणाने रेल्वे प्रशासनाला गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उच्च शिक्षित तरुणाला कचर्‍यामध्ये स्टेशन उपप्रबंधकाचा टाय सापडला. या मुलाने त्या टायचा गैरफायदा घेऊन स्टेशन उपप्रबंधकाला मिळणार्‍या सर्व सोयी उपभोगल्या. एमएससी पदवी घेतलेल्या या तरुणाने या टायच्या आधारे स्टेशन उपप्रबंधक म्हणून मिरवायला सुरुवात केली होती. एका रेल्वे अधिकार्‍याला त्याच्यावर संशय आल्याने अखेर तो पकडला गेला. विशाल राजवन सिंग (२५) हा एमएससी उत्तीर्ण झालेला आहे. पण खूप प्रयत्न केल्यानंतरदेखील त्याला नोकरी मिळत नव्हती. नोकरीच्या शोधात तो वणवण फिरत होता. काही दिवसांपूर्वी वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात फिरत असताना त्याला कचर्‍याच्या ढिगार्‍यात एक टाय सापडला. त्या टायवर स्टेशन उपप्रबंधक असे लिहिलेले होते. ती रेल्वे अधिकारी असल्याची निशाणी होती.

टाय कचर्‍यात फेकणे गैर
रेल्वेचा अधिकारी म्हणून स्टेशन परिसरात काम करणार्‍या अधिकार्‍यांना पदनामवाली टाय दिली जाते. ही टाय शासकीय मालमत्ता असल्याने सुस्थितीत असल्यास कचर्‍यात फेकणे गैर आहे. कोणीतरी ही टाय कचर्‍यात फेकल्याने आरोपीने त्याचा गैरवापर केला.तो टाय हातात येताच आरोपी सिंगने त्याचा वापर करण्याचे ठरवले. सुटबुट परिधान करुन त्याने तो टाय गळ्यात घातला आणि रेल्वे अधिकारी असल्याचे सांगून स्थानकात मिरवू लागला. गळ्यात स्टेशन उपप्रबंधकाचा टाय असल्याने त्याच्यावर कोणी संशयदेखील घेतला नाही. आरोपी विशाल सिंग हा पवईतल्या तुंगा व्हिलेज परिसरात राहतो.

- Advertisement -

विशेष म्हणजे आरोपीने स्टेशन उपप्रबंधक असल्याची बतावणी करुन कोणत्याही प्रवाशाकडून पैसे घेतले नसल्याचे उघड झाले आहे. मात्र वांद्रे स्थानकात सुपरवायझर म्हणून काम करणार्‍या दोघांना धमकावत त्यांच्याकडे असणारे सफाईचे साहित्य जबरदस्तीने काढून घेतले आणि ते घेऊन गेला होता. रेल्वे फॅसिलीटी विभागात काम करणारे मॅनेजर शहाजी बाजीराव जाधव आणि सुपरवायझर उमेश गोरखनाथ नलावडे या दोघांना रेल्वे अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांच्याकडून हॅन्डवॉश, कंगवा, फिनाइलची बाटली अशा प्रकारचे साहित्य घेऊन तो निघून जात असे. वारंवार हा प्रकार होत असल्याने कंटाळून दोघांनी मिळून स्टेशन उपअधीक्षक नवीनकुमार रामाशिष सिन्हा यांच्याकडे त्याची तक्रार केली. सिन्हा यांनी त्याची चौकशी करताच आरोपी सिंग याची तोतयेगिरी उघड झाली. त्याला रेल्वे पोलिसांनी अटक करुन प्रशासनाची फसवणूक करुन सरकारी साहित्याचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. आरोपी सध्या वांद्रे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे.

रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही त्या तरुणाला अटक केली असून प्रशासनाची फसवणूक केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. आरोपी तरुणावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
– सुनीलकुमार जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वांद्रे लोहमार्ग.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -