TRP Racket प्रकरणात मुंबई पोलिसांकडून इंडिया टुडेला क्लिन चीट; रिपब्लिक टीव्ही आणखी गाळात

mumbai police commissioner republic india today barc

इलेक्ट्रॉनिक मीडियामधील सर्वात मोटा टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीवर बोट ठेवले. मात्र जो एफआयआर नोंदविण्यात आला होता. त्यात इंडिया टुडे या इंग्रजी वाहिनीचे नाव टाकण्यात आले होते. मात्र आता मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “एफआयआरमध्ये जरी इंडिया टुडेचे नाव असले तरी त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा आढळलेला नाही. प्राथमिक माहितीमध्ये त्यांचे नाव आले होते. तसेच पुढील चौकशी केल्यानंतर रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांची नावे समोर आली. त्यामुळे त्यांची चौकशी सुरु राहणार आहे.” भारांबे यांच्या या माहितीमुळे इंडिया टुडेला क्लिन चीट मिळाली असून रिपब्लिक टीव्हीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

लोकशाहीचा चौथा खांब म्हणून माध्यमांकडे पाहीले जाते. मात्र व्यावसायिक स्पर्धेतून माध्यमेच घोटाळे करत असतील तर लोकशाहीला कुणीही वाचवू शकत नाहीत, अशा प्रतिक्रिया सामान्य लोकांकडून व्यक्त होत होत्या. त्यात मुंबई पोलिसांच्या एफआयआरमुळे संभ्रम वाढला होता. त्यानंतर पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावर भारांबे यांनी मुंबई पोलिसांची बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, “FIR मध्ये India Today वृत्तावाहिनीचा उल्लेख होता. मात्र त्यानंतर आम्हाला कोणतेही पुरावे किंवा साक्षीदार आढळले नाहीत. तसेच आरोपींनी रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉस्क सिनेमा या वाहिन्यांची नावे सांगितली होती. आता या दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे.”

 

मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात हंसा रिसर्च प्रा.लि.चा रिलेशनशिप मॅनेजर विशाल भंडारी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या गुगल पे अकाऊंटवरुन टीव्ही धारकांना ४०० ते ५०० रुपये फॉरवर्ड केल्याचे स्क्रिनशॉट इंडिया टुडे वाहिनीवर दाखविण्यात आले आहेत. हे पैसे रिपब्लिकन वाहिनी बघण्यासाठी देण्यात आल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितल्याचे निष्पन्न होत आहे.