घरमुंबईआरे वृक्षतोडी विरोधात खोटा प्रचार - अश्विनी भिडे

आरे वृक्षतोडी विरोधात खोटा प्रचार – अश्विनी भिडे

Subscribe

आरे कारशेड परिसरात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने सुरू केलेल्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमींनी शुक्रवारी रात्रीपासून रान उठवले आहे. तर दुसरीकडे एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी आरेमध्ये सुरू असलेला विरोध हा खोटा प्रचार आहे, असे मला वाटते, असे ताशेरे ओढले आहेत. आरे कारशेडसाठी सुरू झालेली वृक्षतोड ही अधिकृत आहे असे सांगत त्यांनी या संपूर्ण कामाची पाठराखण केली आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या १५ दिवसांच्या डेडलाईन नंतरच वृक्ष तोडीच्या कामाला सुरूवात झाली आहे, असे स्पष्टीकरण भिडे यांनी दिले आहे.

सध्या आरे कारशेडच्या वृक्ष छटाई विरोधात खोट्या प्रचाराची हवा सुरू झाली आहे. वृक्ष प्राधिकरणाने १३ सप्टेंबरलाच २१८५ वृक्ष कापण्यासाठी परवानगी दिली होती. पण वृक्ष प्राधिकरणाच्या आदेशानंतर १५ दिवसानंतर हे वृक्ष कापता येणार होते. प्राधिकरणाच्या आदेशानुसार २८ सप्टेंबरपासूनच वृक्ष कापणे शक्य होणार होते. पण त्याची सुरूवात ही ४ ऑक्टोबरपासून झाली असल्याचा खुलासा अश्विनी भिडे यांनी केला आहे. उच्च न्यायालयात काही याचिकांवरील आदेश येईपर्यंत आम्ही थांबलो होतो.

- Advertisement -

शुक्रवारी उच्च न्यायालयाने आरे कारशेडच्या विरोधातील सगळ्या याचिकांसाठी एमएमआरसीच्या बाजुने निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही काही लोक स्वतःला न्यायालयापेक्षा सर्वोच्च समजत आहेत. त्यांच वागणच हे मुळात चुकीच आहे. जर न्यायालयीन लढाई तुम्ही हरला आहात तर आता हे सन्मानाने मान्य करायला हवे. ही लढाई रस्त्यावर आणून त्याचा काहीही उपयोग नाही असेही अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले आहे. याचिकाकर्त्याला ५० हजार रूपयांचा दंडही करण्यात आला आहे.

वृक्ष प्राधिकरणाची ऑर्डर वेबसाईटवर
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने १३ सप्टेंबरला दिलेली ऑर्डर ही महापालिकेच्या वेबसाईटवर ४ ऑक्टोबरला सायंकाळी अपलोड झाली आहे. तसेच वृक्षतोडीला सुरूवातही सायंकाळीच मोठ्या पोलीस बंदोबस्तात झाली आहे. आरे वृक्षतोडीला विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांना आतापर्यंत २९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शासकीय कामामध्ये अडथळा आणल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. तर काही जणांना निदर्शने केल्यासाठीही ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

एमएमआरसीने लावली २४ हजार झाडे
एमएमआरसीने आतापर्यंत २४ हजार झाडे मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात लावली आहेत. सुरक्षित, आरामदायी आणि जलद प्रवासासाठीचा हा प्रकल्प असून झाडे लावण्यासाठी एमएमआरसीने आम्हाला मदत करावी असेही एमएमआरसीने आवाहन केले आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या आदेशानुसार १३ हजार ११० झाडे लावण्याचे आदेश एमएमआरसीला देण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -