रिक्षावर उदरनिर्वाह असलेली कुटुंबे संकटात

भरमसाठ परवान्यांमुळे धंदा संपला

Mumbai
Vasai rikashaw permit

नवीन परमिटच्या नावाखाली बजाज कंपनीच्या गाड्या विकण्याचा धंदा सुरू झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षांची वाढ झाली आहे.अनेकांनी पार्ट टाईम म्हणून रिक्षा घेतल्याने याचा फटका दिवसभर मेहनत करून रिक्षा व्यवसायावरच संसाराचा गाडा हाकणार्‍या रिक्षा चालकांना बसला आहे. भविष्यात जर परमिट बंद झाले नाही तर मूळ रिक्षा चालकांना कठिण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. सप्टेंबर २०१७ पूर्वी शहरात १२,९९० रिक्षा होत्या. शासनाने परवाने खुले केल्यामुळे त्यात वाढ होऊन रिक्षांनी १७ हजारांचा आकडा ओलांडला आहे. रिक्षा वाढल्या मात्र व्यवसाय घटल्याने रिक्षावर उदरनिर्वाह चालवणारे परिवार संकटात सापडले आहेत.

तीन वर्षांपूर्वी परवाना तुडवडा असल्यामुळे बोगस रिक्षांचा सुळसुळाट सुटला झाला होता. त्यावर पर्याय म्हणून राज्य शासनाने परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज प्रत्येक रिक्षाचालक हा परवानाधारक बनला असला तरी आज हाच परवाना रिक्षाचालकांच्या रोजीरोटीवर आला आहे. परवाने किती द्यायचे आणि केव्हा बंद करायचे हे धोरणच नसल्याने आजही अनेक नवीन गाड्या रस्त्यावर येताना दिसून येत आहेत. शहरात १६२ स्टँड असून, एवढ्या रिक्षा सामावून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे दहा रिक्षा उभ्या करण्याची परवानगी असलेल्या स्टँडवर २० ते ३० रिक्षा उभ्या राहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पूर्ण रोडवर रांगा लागल्याचे दिसून येते. शहरातील रिक्षा संघटनांनी परवाने बंद करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी वाशीतील शिवाजी चौकामध्ये उपोषणही केले होते; परंतु यानंतरही अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.

अनेक दिवसांपासून शहरातील रिक्षा संघटनांनी नवीन रिक्षा परवाने बंद करण्याची मागणी केली आहे. रिक्षाचे नवीन परवाने देण्यासंदर्भात शासनाचे धोरण आहे. त्यामुळे यावर आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही. संघटनांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने सदर बाब प्रत्येक वेळी शासनस्तरावर कळविण्यात येत आहे.
-दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

रिक्षा हे सामान्य नागरिकांचे उत्पन्नाचे साधन असले तरी ते मात्र राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे कुरण आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून लाखोंची डील वरिष्ठ पातळीवर होत असल्याने त्याचा फायदा आपोआप पक्षाच्या नेत्यांना जातो.त्यामुळे कितीही तक्रारी केल्या कितीही आंदोलने केली तरीही आहे तशीच परीस्थिती राहत असल्याने न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हजारो परवाने नव्याने देण्यात आले आहेत. आजही परमिट देणे सुरू आहे.
-सुनील बोर्डे, अध्यक्ष, वाशी रिक्षा चालक युनियन

ज्यावेळी परवाने कमी होते त्यावेळी बोगस रिक्षांचा सुळसुळाट होता, तरीही व्यवसाय १००० ते १२०० रुपयांपर्यंत होत होता.बोगस रिक्षा कमी झाल्या तर त्यात अजून वाढ होईल असे वाटले होते. त्या कमी झाल्या मात्र परवाने मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने रिक्षांची संख्या दुपटीने वाढली. त्यामुळे व्यवसाय आता ५०० ते ७०० वर ठेपला आहे. यात घर चालवणार की रिक्षाचा खर्च भागवणार असा प्रश्न पडला आहे.
-राजू जाधव, रिक्षा चालक, वाशी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here