ओल्या दुष्काळासाठी शेतकरी एकवटला

Mumbai
नुकसान भरपाईच्या मागणीसाठी वाड्यात आयोजित केलेल्या निर्धार सभेला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

राज्यात पावसाने सर्वत्रच हाहाकार माजवला असून कोकणातील शेतकर्‍याच्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.या शेतकर्‍याला आता सरकारी मदतीची अपेक्षा असून नुकसान भरपाईसाठी कोणतेही वेगळे नियम न लावता ओला दुष्काळ जाहीर करून सरसकटपणे नुकसान भरपाई मिळावी यासह अन्य अनेक मागण्यांसाठी वाडा येथे शेतकर्‍यांनी निर्धार सभा आयोजित केली होती. या सभेला शेतकर्‍यांनी तुफान गर्दी केली.

राज्यातील शेतकरी आज ओल्या संकटात असून भातशेती असो की अन्य कसलेही पीक असो शेतकरी उध्वस्त झालेला आहे.सरकार मात्र सत्ता स्थापन करण्याची गणिते जुळवण्यात मग्न असून त्यांना शेतकर्‍यांचे अश्रू दिसत नाहीत. एकही अधिकारी शेतकर्‍याच्या बांधावर पंचनामा करायला गेला नाही, असा आरोप शेतकरी नेते हरिभाऊ खाडे यांनी बोलताना केला. आंदोलन करायला नेत्यांची गरज नाही येत्या काळात शेतकरी आपली ताकत दाखवून देईल, असा विश्वास खाडे यांनी बोलून दाखवला.

कागदपत्रांच्या कचाट्यात न अडकवता सरसकट नुकसान भरपाई शेतकर्‍याला मिळाली पाहिजे. विमा कंपन्यांनी आता आपले हात वर न करता शेतकर्‍यांना विम्याचा लाभ घ्यावा अन्यथा त्यांची बरीगत नाही, असा इशारा विश्वनाथ पाटील यांनी देत रेशन दुकानात स्वस्तात तांदूळ उपलब्ध करून सरकारने भातखरेदी केंद्रावर 4 हजार क्विंटल दराने भात खरेदी करावी अशी मागणी केली. 144 कलमाचा आदर करून आजची सभा स्थगित करीत असलो तरी येत्या 18 तारखेला शेतकरी तहसीलदार कार्यालयांना घेराव घालतील असा इशारा विश्वनाथ पाटील यांनी यावेळी दिला. निर्धार सभेला तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता. ज्यात सर्व जातीचे शेतकरी व महिला सहभागी होत्या.