वांद्रे-वरळी सी लिंकवर फास्टॅग प्रणाली

Mumbai
वांद्रे वरळी सी लिंक

राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे – वरळी सागरी सेतू) पथकर नाक्यावर शुक्रवारी फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. फास्टॅग प्रणालीने परिपूर्ण असलेला हा मुंबईतील पहिला पथकर नाका ठरला आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी सहा मार्गिका फास्टॅगमध्ये रुपांतरीत करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यभरातील फास्टॅग प्रणालीसाठी पथकर नाक्यांवर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नियुक्ती केली आहे. त्याअंतर्गत मुंबईतील राजीव गांधी सागरी सेतूवर शुक्रवारी फास्टॅग प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. सागरी सेतूच्या पथकर नाक्यावर एकूण 16 मार्गिका आहेत.

पहिल्या टप्प्यात पथकर नाक्यावरील सहा मार्गिका ह्या फास्टॅग वाहनधारकांसाठी राखीव असतील. पुढील काही दिवसांमध्ये आणखी सहा मार्गिका फास्टॅगमध्ये रुपांतरीत करण्यात येतील. उर्वरित चार मार्गिका ह्या रोख भरणा (Cash payment) म्हणून राहतील. ‘सागरी सेतूवरील पथकर नाक्यावरील फास्टॅग प्रणालीमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होईल. नाक्यावर रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. मुंबईतील इतर पथकर नाक्यावर ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे’, असे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

पथकर नाक्यावर फास्टॅग

वाहनचालकांना फास्टॅग विकत घेण्यासाठी पथकर नाक्यावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आयडीएफसी बँकेमार्फत पथकर नाक्यावर Point of sales (POS) ची उभारणी केली असून फास्टॅग मिळू शकेल.

मासिक पासधारक

राजीव गांधी सागरी सेतूच्या मासिक पासधारकांचा पास नेहमीच्या प्रचलित पद्धतीनुसार पासच्या वैधतेपर्यंत वापरता येईल. फास्टॅग प्रणालीमुळे त्यावर काही विपरित परिणाम होणार नाही. भविष्यात सगळी ‘मासिक पास’ सुविधा ‘फास्टॅग’ मार्फत करण्यात येईल. त्यासाठी मासिक पासधारकांना एमईपी कंपनीमार्फत मार्च 2020 पर्यंत फास्टॅग प्रणालीत परिवर्तित होण्याची मुभा दिली आहे.