Crime: अल्पवयीन मुलीवर पित्याकडून लैगिंक अत्याचार

minor girl raped
प्रातिनिधिक छायाचित्र

अंधेरी येथे एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बलात्कारासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमेश्वर कामठे यांनी दुजोरा दिला, मात्र अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.

सोळा वर्षांची ही पिडीत मुलगी अंधेरी परिसरात राहते. गेल्या काही वर्षांपासून तिचे वडिल तिच्यावर लैगिंक अत्याचार करीत होते. हा प्रकार तिने कोणालाही सांगू नये म्हणून तो तिला जिवे मारण्याची धमकी देत होता. वडिलांकडून होणार्‍या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. मुलीकडून ही माहिती समजताच आईला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिने तिच्यासोबत आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पिडीत मुलीचा पित्याविरुद्ध पोलिसांनी ३७६ (२), (एफ), (आय), ५०६ भादंवि सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. पीडित मुलीची मेडीकल करण्यात आली असून लवकरच आरोपीची मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.