घरमुंबईउल्हासनगरातील मैदान नष्ट होण्याची भीती

उल्हासनगरातील मैदान नष्ट होण्याची भीती

Subscribe

धार्मिक, राजकीय कार्यक्रमांमुळे खोदकाम

राजकीय व धार्मिक कार्यक्रमासाठी येथील गोल मैदानात सर्रासपणे खोदकाम आणि खडी टाकण्याचे काम केले गेले असून यामुळे खेळाडूंना या मैदानात खेळणे अशक्य झाले आहे. मनपा प्रशासनाच्या प्रभाग समिती समोरच हे काम होत असून सुद्धा त्याकडे डोळेझाक केली जात आहे.

उल्हासनगर 2 येथे प्रभाग समिती 1 कार्यालयासमोर गोल मैदान आहे. शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतके बगीचे व मैदाने शिल्लक आहेत. त्यापैकी गोल मैदान हे एक आहे. मात्र या मैदानात सतत सार्वजनिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम केले जात असल्याने खेळाडूंना फार कमी वेळा खेळायची संधी मिळते.

- Advertisement -

9 सप्टेंबर 2019 रोजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळाव्याचा कार्यक्रम शहराध्यक्ष भगवान भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजकांनी संपूर्ण मैदानात खडी टाकून आणि ठिकठिकाणी खड्डे खोदून त्या ठिकाणी एक भव्य शामियाना उभारला होता. आता एका धार्मिक कार्यक्रमासाठी पुन्हा या मैदानात डेब्रिज आणि मातीचा भराव टाकला जात आहे. धार्मिक व राजकीय कार्यक्रमांमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते अशा तक्रारी होत आहे, या प्रकरणी आयोजकांवर फौजदारी गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

गोल मैदान भाडे तत्वावर देताना अनेक अटी व शर्थी मनपा प्रशासनाने लादल्या आहेत. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की मैदानात खड्डे खोदू नयेत, ध्वनिप्रदूषण करू नये, कचरा टाकू नये, असे झाल्यास आयोजकांकडून दंडवसुली करावी असे नियम आहेत. मनपाच्या सर्वसाधारण सभेत 2002 साली बहुमताने हा ठराव मंजूर झालेला होता. मात्र या मैदानात विविध कार्यक्रमाचे आयोजक सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन करतात अनेकवेळा तक्रारी करून देखील कारवाई होत नाही.
-सरिता खानचंदानी, सदस्य, हिराली फाउंडेशन

- Advertisement -

आमच्या कार्यक्रमापूर्वी या मैदानात पावसामुळे चिखल व पाण्याचे डबके झाले होते त्यावेळी आम्ही तात्पुरती उपाययोजना केली होती. या मैदानात मी माझ्या नगरसेवक निधीतून 10 लाख रुपये खर्च करून लाल माती आणि भराव टाकणार आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा चांगले मैदान होईल.
-भगवान भालेराव, रिपाइं शहराध्यक्ष उल्हासनगर

हा गंभीर प्रकार असून मी मालमत्ता विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्यांनी या मैदानात बेकायदेशीररित्या भरणी केली आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
-सुधाकर देशमुख, मनपा आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -