घरमुंबईअजोय मेहतांना भीती वाटते तरीही फूटपाथ उखडलेले

अजोय मेहतांना भीती वाटते तरीही फूटपाथ उखडलेले

Subscribe

फूटपाथसाठी २४ कोटी निधी ,खर्च फक्त ८.५ कोटी

‘मुंबईतील फुटपाथवरून चालताना माझ्या आई-बाबांना भीती वाटते’, हे विधान कुणा सामान्य माणसाचे नाही तर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचे स्वत:चे आहे. दीड वर्षांपूर्वी प्रेस क्लबमधील कार्यक्रमात आयुक्तांनी ही कबुली दिली होती. तरीही मुंबईतील तुटक्या, फुटक्या आणि उखडलेल्या पेव्हर ब्लॉकच्या फुटपाथवरून चालताना वृद्धांसह सर्वांचीच आदळआपट होत असल्याचे समोर आले आहे. अंध व्यक्तीलाच नव्हे, तर डोळस व्यक्तींनाही फुटपाथवरून नीट चालता येत नाही. उखडलेल्या पेव्हर ब्लॉकला पाय आपटून रक्तबंबाळ होण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. विशेष म्हणजे आई-वडिलांची भीती व्यक्त करून दाखवणार्‍या अजोय मेहता यांच्या हातीच फुटपाथच्या दुरुस्तीची जबाबदारी असूनही मुंबईकरांना चालण्यायोग्य फुटपाथ कधी मिळतील, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मुंबईतील फुटपाथवरील अतिक्रमण हटवून त्यांचे रुंदीकरण करून ते पादचार्‍यांना चालण्यास मोकळे करून दिले जावेत, असा आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर आजही फुटपाथची दूरावस्था पहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये पदपथांवरील पेव्हरब्लॉक्स तसेच टाईल्स या तुटलेल्या आहेत. तर काही भागांमध्ये फुटपाथ सुस्थितीत असले तरी त्यावरील एखाद दुसरे पेव्हरब्लॉक असमांतर असल्याने नागरिकांना चालताना मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वीच दादरमधील नक्षत्र मॉलसमोरील फुटपाथवरून चालताना उखडलेल्या पेव्हरब्लॉकची ठेच लागून एका आजीबाईंवर पडून रक्तबंबाळ होण्याची वेळ आली होती. त्यानंतर येथील फेरीवाल्यांनी या आजीबाईंना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले होते.

- Advertisement -

मुंबईत यावर्षी फुटपाथच्या दुरुस्तीसाठी 24 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील आतापर्यंत साडेआठ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र उर्वरीत निधी शिल्लक आहे. जिथे खरोखरच फुटपाथ खराब आहे तेथील फुटपाथची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. परंतु त्याची डागडुजी करून पेव्हरब्लॉक समांतर केले जात नाहीत. अनेक ठिकाणी आवश्यक नसतानाही चांगल्या लाद्या तोडून टाकत सर्वत्र नवीन पेव्हरब्लॉक बसवले जातात.फुटपाथ दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या विभाग कार्यालयांकडे आहे. परंतु याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. किरकोळ दुरुस्ती करून फुटपाथ नागरिकांना चांगल्याप्रकारे वापरण्यास उपलब्ध होवू शकतात. परंतु कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सरसकट सर्वच पेव्हरब्लॉक काढून नव्याने बसवले जातात. नव्याने बनवलेल्या पदपथावरून मुंबईकरांना बिनधास्तपणे चालता येत नाही. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच डिझाईनचे पेव्हरब्लॉक बसवले जावे, अशी मागणी पुढे येत आहे.

- Advertisement -

वडाळा येथील पाच उद्यान परिसरातील फुटपाथचे पेव्हरब्लॉक्स उखडलेले आहेत. हे पदपथ काही वर्षांपूर्वीच बनवले आहे. पण हमी कालावधी बाकी असूनही थातूरमातूर काम केले जाते. सहा महिन्यांपासून आपण महापालिकेकडे तक्रार करत आहोत. पण पेव्हरब्लॉक बदलले जात नाहीत. त्यामुळे दर दिवशी नागरिक या पेव्हरब्लॉकवरून पडत आहेत.
– निखिल देसाई, समन्वयक, अग्नी संस्था आणि एफ उत्तर सिटीझन फेडरेशनचे प्रमुख.

मुंबईतील फुटपाथच्या दुरुस्तीसाठी पुरेशा निधीची तरतूद आहे. महापालिका आयुक्तांनी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना फुटपाथचे तुटलेले, तसेच निखळलेले पेव्हर ब्लॉक तातडीने बसवून घ्या, जे फुटपाथ पूर्णपणे खराब झालेले असतील, तिथे नवीन पेव्हरब्लॉक अथवा लाद्या बसवण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
– विनोद चिठोरे, रस्ते प्रमुख अभियंता, मुंबई महानगरपालिका

मुंबईत एकही फुटपाथ चालण्यायोग्य नाही. ‘पेडिस्ट्रीयन फर्स्ट’ म्हणणार्‍या आयुक्तांकडून फुटपाथाबाबत ज्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे फुटपाथ सुस्थितीत नाही. या फुटपाथवरून लोकांना कधीपर्यंत चांगल्याप्रकारे चालता येईल, याचे उत्तर आयुक्त आणि प्रत्येक विभागांच्या सहाय्यक आयुक्त यांनी द्यायला हवे.
– रईस शेख, गटनेते, समाजवादी पक्ष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -