कुर्ला स्थानकात महिलेची प्रसूती

एका २५ वर्षीय महिलेची मध्य रेल्वेवरील कुर्ला रेल्वे स्थानकात यशस्वी प्रसूती करण्यात आली आहे.

Mumbai
female deliveries at kurla station
कुर्ला स्थानकात महिलेची प्रसूती

रुग्णालयात तपासणी करुन घरी परतत असताना एका २५ वर्षीय महिलेची मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकात प्रसूती करण्यात आली आहे. मात्र, प्रसूतीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुर्ला स्थानकात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. यामुळे महिलेला टॅक्सीमधून रुग्णालयात दाखल करण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढावली.

कुर्ला स्थानकात रुग्णवाहिका नाही

कुर्ला, बुध्द कॉलनी येथे राहणारी अमिरुन्नीस नसीम खान (२७) सात महिन्यांची गरोदर होती. ही महिला गरोदरपणातील तपासणीसाठी भायखळा येथील रुग्णालयात गेली होती. यावेळी तिचा पती नसीम ललई खान देखील तिच्या सोबत होता. या दोघांनी भायखळा स्थानकातून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण दिशेला जाणारी लोकल पकडली. साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लोकलमध्येच अमिरुन्नीसला प्रसूती कळा सुरु झाल्या. कुर्ला स्थानकावर पोहचताच महिला पोलीस, रेल्वे सुरक्षा बलांच्या महिला अधिकार्‍यांसह महिला तिकिट तपासणीसांच्या मदतीने फलाट क्रमांक २ वर अमिरुन्नीसने गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ आणि आई दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
प्रसूती झाल्यानंतर आई आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे रुग्णवाहिकेची मदत मागितली. मात्र, स्थानकात १०८ हेल्पलाईन क्रमांकांची रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. यामुळे महिला रेल्वे पोलिसांच्या मदतीने टॅक्सीत घालून अमिरुन्नीस आणि तिच्या बाळाला कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली आहे.


हेही वाचा – ठाणे स्टेशनच्या वनरुपी क्लिनिकमध्ये महिलेची सुखरूप प्रसूती