घरताज्या घडामोडीनवी मुंबईत मृत्युदर रोखण्यासाठी जोरदार लढाई सुरू - आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

नवी मुंबईत मृत्युदर रोखण्यासाठी जोरदार लढाई सुरू – आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

Subscribe

लॉकडाऊन उठवल्यानंतर नवी मुंबईत दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढली. मात्र, हाऊस टू हाऊस सर्वेक्षण आणि मास स्क्रिनिंग करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत. सध्या नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८ ते ६० टक्के आहे तर मृत्युदर ३.३ टक्के आहे. रिकव्हरी रेट वाढवून मृत्युदर कमी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे, कोरोनाला हरविण्यासाठी आम्ही लढत आहोत, अशी भावना नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नवी मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये अर्थात विशेष क्षेत्रात सात दिवसांचा लॉकडाऊन सुरु केला आहे, कोरोनाच्या लढाईत जनतेची गांभीर्याने साथ हवी, सरकारने दिलेल्या नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन करायला हवे, तरच कोरोनाचे युद्ध जिकंता येईल, असे देखील मिसाळ यांनी यावेळी नमूद केले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव, सद्यस्थिती आणि केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर मिसाळ यांनी सविस्तर बातचीत केली. आरंभीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचा फायदा झालाच. मात्र, लॉकडाऊन अनलॉक व्हायला सुरुवात झाली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला. नवी मुंबईत जी गर्दीची ठिकाणे आहेत, अशा ठिकाणी रुग्ण वाढले. रिकव्हरी रेट वाढवून मृत्यू दर कमी करण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे मिसाळ यांनी नमूद केले. दाट लोकवस्तीमध्ये विशेषतः झोपडपट्टी, गावठाण परिसरात केसेस वाढलेल्या दिसतात. अशा ठिकाणी विशेष गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याचे ते म्हणाले. सध्या नवी मुंबईतील रुग्णांचा आकडा वाढतो आहे. गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा उडत असलेल्या बोजवारा यामुळे रुग्ण संख्येत भर पडतेय. मास स्क्रीनिंगमुळे रुग्ण कळतायत. एकूणच परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने पॅरामेडिकल टीम आणि डॉक्टर्स टीम कार्यरत केली आहे. त्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर दिले आहेत. मास स्क्रीनिंगद्वारे प्रत्येक माणसांची नोंद घेत आहोत. कोरोना सदृश काही लक्षणे आढळली तर त्याची दखल  घेतली जात आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोनाच्या संकट काळात सिनिअर सिटीजन आणि पूर्वीच्या इतर आजाराने त्रस्त असलेल्या नॉन कोविड रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांची वेगळी नोंद घेली जात आहे. त्यांच्या इतर आजारांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे आयुक्त मिसाळ म्हणाले. जास्तीत जास्त स्क्रीनिंग आणि टेस्ट वाढवल्या आहेत. त्यांना लवकर उपचार कसे मिळतील यासाठी प्रयत्न करीत आहोत.यातून रुग्ण वाढ दिसते. परंतु भविष्यातला धोका टाळता येईल, असा विश्वास मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोनाशी लढण्यासाठी नवी मुंबई मनपा सज्ज असून साडेसात ते आठ हजार बेड्स आपल्याकडे कोव्हीडसाठी उपलब्ध आहेत. आणखी २०० बेड्स आयसीयू व्यवस्था करीत असल्याचे आयुक्त म्हणाले. कोरोनाचे संकट आहेच, मात्र पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू सारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढेल, त्याअनुषंगाने धुरीकरण, फवारणी आणि आवश्यक ती उपाययोजना केली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात तसेच नेरुळ येथील डी वाय पाटील रुग्णालयात मोफत उपचाराची व्यवस्था असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा सात हजारच्या घरात पोहचला आहे. दिवसागणिक ही संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची ही साखळी तोडण्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये सध्या लॉकडाऊन सुरु केले आहे. शहरातील कंटेनमेंट असलेले ४६ झोन आणि विशेष १२ झोनमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारच्या हॉटस्पॉट यादीत नवी मुंबईतील तुर्भे झोपडपट्टी आहे. तुर्भे झोपडपट्टीत १ लाख लोकवस्ती आहे. तिथे विशेषत्वाने काम सुरु केले आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून ११ जून पासून तिथे नवीन रुग्ण सापडले नाहीत, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.

- Advertisement -

एकदा योद्धा म्हटलं की, आपण जिंकायचं कस याचा विचार करतो. प्रशासनाचा प्रमुख या जबाबदारीने लढणे अपरिहार्य आहे. या लढाईत सर्वांचा सहभाग आहे. जनतेचा सहभाग देखील अत्यंत महत्वाचा आहे, असे मिसाळ म्हणाले. मार्च महिन्यापासून आपण कोरोनाशी लढतोय, लढाई अजून सुरु आहे, ती जिंकण्यासाठी नवी मुंबईकरांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. सोशल डिस्टंसिंगचे काटेकोपणे पालन करावे, मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावेत, विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा आपणच करावी, असे आवाहन मिसाळ यांनी आपलं महानगरद्वारे नवी मुंबईकरांना केले आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ सविस्तर मुलाखत | Navi Mumbai Municipal Commissioner Annasaheb Misal detailed interview

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, July 1, 2020

हेही वाचा –

अस्वस्थतेमुळे आदित्य ठाकरे यांचा विठ्ठल-रुख्मिनीच्या पूजेतून काढता पाय

नवी मुंबईत मृत्युदर रोखण्यासाठी जोरदार लढाई सुरू – आयुक्त अण्णासाहेब मिसाळ
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -