अखेर केबल टेलिव्हिजन ब्लॅकआऊट

केबल ऑपरेटर्समध्येही फूट

Mumbai
केबल टेलिव्हिजन ब्लॅकआऊट

ट्रायच्या नव्या दरांच्या अंमलबजावणीविरोधात मुंबईसह राज्यातील केबल ऑपरेटर्सने गुुरुवारी टेलिव्हिजन ब्लॅकआऊटची अंमलबजावणी केली. केबल ब्रॉडकास्ट अ‍ॅण्ड ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल परब यांनी ब्लॅकआऊटची हाक दिली होती. त्यानुसार सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान हा ब्लॅकआऊट झाला होता. त्यामुळे केबल टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांना कोणत्याही वाहिन्या पाहता आल्या नाहीत. पण केबल ब्लॅकआऊटच्या निमित्ताने केबल ऑपरेटर्समध्ये फूट पडली आहे. महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनने या ब्लॅक आऊटमध्ये सहभाग घेतलेला नाही.

केबल बंद ठेवून ग्राहकांना नाहक त्रास देण्यापेक्षा ट्रायसोबत बैठकीतून तोडगा काढता येईल अशी भूमिका महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाऊंडेशनने घेतली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी दिली. ट्रायसोबतच्या बोलणीतून काही तरी तोडगा नक्कीच काढता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ट्रायने वाढवलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांचे केबलचे महिन्याचे बजेट लांबणार आहे, अशी भूमिका केबल ब्रॉडकास्ट अ‍ॅण्ड ऑपरेटर असोसिएशनने घेतली आहे.

ट्रायच्या चॅनलनुसारच्या दरांमुळे एकूण चॅनेल बकेटची किंमत वाढणार आहे. त्यामुळे ट्रायच्या २९ डिसेंबरपासूनच्या नवीन दर अंमलबजावणीविरोधात असोसिएशनने विरोध करणारी भूमिका घेतली आहे. केबल ब्लॅकआऊट हा त्याचाच एक भाग म्हणून करण्यात आला आहे अशी भूमिका संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हॉटस्टारचा पर्याय
केबल ऑपरेटर्सने ब्लॅकआऊट केला असला तरीही अनेक प्रेक्षकांनी हॉटस्टार, जिओ आणि व्हुटचा पर्याय स्विकारला. डेटा पॅकमुळे संपूर्ण चॅनेल्सच लाईव्ह स्ट्रिमिंग हे इंटरनेटच्या माध्यमातून पाहणे प्रेक्षकांना शक्य झाले.