घरमुंबईमनसेच्या देशपांडे, धुरींची सहायक आयुक्तांना धक्काबुक्की, FIR दाखल

मनसेच्या देशपांडे, धुरींची सहायक आयुक्तांना धक्काबुक्की, FIR दाखल

Subscribe

मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी जी साऊथ वॉर्डच्या सहायक आयुक्तांना धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी घडली असून या दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मनसेच्या माजी नगरसेवकांकडून महापालिकेच्या जी/दक्षिण विभागाच्या अधिकार्‍यांना शनिवारी धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करण्यात आली आहे. याप्रकरणी मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात वरळी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, याच्या निषेधार्थ सोमवारी महापालिका जी/दक्षिण विभागातील कर्मचार्‍यांच्या वतीने म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. मनसेचे संतोष धुरी यांनी मात्र, महापालिकेच्या अधिकार्‍यांकडूनच आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ तसेच धमकी दिल्याचा उलट आरोप केला आहे.

आयुक्तांची पोलिसात तक्रार

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि विभाग संघटक संतोष धुरी यांनी पालिकेने वरळी भागातील फेरीवाल्यांवर किती कारवाई केली? याचा जाब जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन आणि अधिकारी गवस यांना विचारला. मात्र, याची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी कार्यालयात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्धा तास मनसेचे कार्यकर्ते जैन यांच्याशी हुज्जत घालत होते. यामध्ये मनसेच्या पदाधिकार्‍यांनी धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांना पाचारण करून परिस्थिती शांत करण्यात आली. अधिकार्‍यांवर झालेल्या या हल्ल्याबाबत देशपांडे आणि धुरी यांच्याविरोधात महापालिकेच्या वतीने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात शाब्दिक चकमक

सोमवारी पालिका कर्मचाऱ्यांचा कामबंद

या हल्ल्याचा निषेध म्हणून म्युनिसिपल मजदूर युनियनने सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळपासून सर्व कर्मचारी कामावर हजर न होता आंदोलनात सहभागी होऊन अधिकार्‍यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतील, असे युनियनचे गोविंद कामतेकर यांनी म्हटले आहे.

खुशाल कामबंद करावा – संतोष धुरी

मनसेचे विभाग संघटक संतोष धुरी यांनी मात्र, ‘आपण केवळ फेरीवाल्यांवर महापालिकेने किती कारवाई केली? याची माहिती जाणून घ्यायला गेला होतो. परंतु अधिकारी थेट सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांच्या दालनात जाऊन बसले. पण त्यानंतरही त्यांच्याकडून माहिती देण्यात येत नव्हती. मात्र, आपण कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की केलेली नसून जैन यांनीच आम्हाला धमकी देत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आम्ही त्यांना धक्काबुक्की केल्याचे’ सांगितले. ‘त्यामुळे जर याचा निषेध म्हणून कामबंद आंदोलन केले जाणार असेल, तर त्यांनी खुशाल करावे’, असेही त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – नारायण राणेंना धक्का; स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -