कळवा स्टेशनजवळ नाल्यातील कचर्‍याला आग

लोकलला आग लागल्याची अफवा, भीतीने वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका?

कळवा परिसरात रेल्वे लोकल रुळालगत असलेल्या नाल्यातील कचर्‍याने पेट घेतला आणि रेल्वे लोकलला आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. त्यामुळे सुमारे अर्धा तास लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले. हा गोंधळ नियंत्रणात आल्यावर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लोकल सेवा पूर्ववत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. रेल्वे लोकलला आग लागल्याची अफवा पसरताच रेल्वेमधील उसळलेल्या गर्दीत महिला प्रवासी रेवती संपत (६३ रा. मुंब्रा शिळफाटा) यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना त्वरित कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली. ही आग नियंत्रत आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि रेल्वेच्या यंत्रणेने प्रयत्न केले. मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या शिवाजीनगर येथील रेल्वे रुळाखालील मोठ्या गटारामधील कचर्‍याला शुक्रवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

कचर्‍याने पेट घेतल्याने काही क्षणात धुराचे लोट चहुबाजूने पसरू लागले. मोठ्या प्रमाणात धूर रेल्वे रुळाखालील गटारातून रेल्वे मार्ग परिसरात पसरला. धुरामुळे समोरील लोहमार्ग दिसत नसल्याचे रेल्वे प्रशासनाने धीम्या मार्गावरील अप-डाऊन ही लोकल सेवा काही काळासाठी थांबवली. त्यामुळे ऐन वर्दळीच्या वेळेत लोकलचे वेळापत्रक कोलमडले. तब्बल २० ते २५ मिनिटे अप व डाऊन मार्गवरील लोकलसेवा ठप्प झाली होती. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच ठामपा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्रिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर ही आग आटोक्यात आणली. साधारणत: पाच वाजण्याच्या सुमारास लोकल सेवा पूर्ववत झाली असली तरी या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा त्रास चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात झाला. यावेळी कळवा स्थानकानजीक थांबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली लोकलमधील रेवती संपत या वृद्ध प्रवासी महिलेला हृदयविकाराचा झटका आला. सहप्रवाशांनी तातडीने याबाबतची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाला दिल्याने त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.