परदेशी वैद्यकीय शिक्षणासाठी परीक्षांचे अग्निदिव्य

विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण

Mumbai
विद्यार्थी

परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी सक्षम असावेत यासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता प्रवेश प्रक्रिया (नीट) परीक्षा यावर्षी केंद्र सरकारने बंधनकारक केली आहे. त्यामुळे परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना नीट व एफएमजीई या दोन परीक्षांबरोबरच परदेशातील एक परीक्षा अशा तीन परीक्षांच्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागणार आहे. परीक्षांच्या या अग्निदिव्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांची अवस्था परदेशी शिक्षण नको पण परीक्षा आवरा अशी झाली आहे.

परदेशातील अनेक वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी सक्षम आहेत की नाही याची खातरजमा करण्यात येत नाही. त्यामुळे पैसे आणि ओळखीच्या बळावर अनेक विद्यार्थी परदेशातील महाविद्यालयांतून पदवी घेऊन भारतात येतात. त्यामुळे परदेशात प्रवेशासाठी जाणारा विद्यार्थी हा वैद्यकीय शिक्षणासाठी सक्षम असावा आणि पैशाच्या बळावर पदवी घेऊन भारतात येणार्‍यांना आळा घालावा यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 2018 पासून नीट परीक्षा बंधनकारक केली आहे.

दरवर्षी सुमारे 7000 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी जातात. त्यामधील सर्वाधिक विद्यार्थी चीन आणि रशियाची निवड करतात. ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यामुळे यंदा शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विदेशातील संबंधित संस्थेचीही पात्रता परीक्षा द्यावी लागते. त्यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामसुद्धा (एफएमजीई) द्यावी लागते. या परीक्षेत केवळ 12 ते 15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात.

पाच वर्षांत परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त १३.०९ टक्के ते २६.९ टक्के विद्यार्थीच एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण झाले. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स (एनबीई) च्या आकडेवारीनुसार पाच वर्षांत एफएमजीई परीक्षेला सुमारे ६३ हजार विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अनेक डॉक्टर नंतर बेकायदेशीररीत्या प्रॅक्टिस करताना आढळतात जे रुग्णहितासाठी हानीकारक आहे. ही परीक्षा अवघड असल्याची टीका विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही.

परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाण्यापूर्वी बंधनकारक केलेले नीट, परदेशातील महाविद्यालयातील परीक्षा आणि पुन्हा देशात प्रॅक्टीस करण्यासाठी द्यावी लागणारी एफएमजीई परीक्षा यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. अभ्यासाऐवजी परीक्षाच द्यावे लागत असल्याची खंतही विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना नीट’ परीक्षा देणे बंधनकारक केले आहे. भारतात परतल्यानंतर त्यांना एफएमजीई’ द्यावी लागते. या परीक्षेचा निकाल अल्प लागत असला, तरी त्यात सुधारणा करण्याचा अधिकार सरकारला आहे.
– गिरीश त्यागी, कुलसचिव, एमसीआय

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here