घरमुंबईहॉस्पिटलमधील अग्निशमन यंत्रणांची ऐसी तैसी

हॉस्पिटलमधील अग्निशमन यंत्रणांची ऐसी तैसी

Subscribe

सरकारी हॉस्पिटले वार्‍यावर; सुरक्षेचे तीनतेरा

अंधेरीतील कामगार विमा हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर मुंबई ठाण्यातील सरकारी व पालिका हॉस्पिटलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. मुंबईतील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलांमध्ये रुग्णांना पुरेशी सुविधा सोडाच पण त्यांच्या सुरक्षेकडेही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी डागडुजीच्या नावाखाली गळके छत, कोसळणारे प्लास्टर, लोंबकळत असलेल्या इलेक्ट्रीक वायर यामुळे रुग्णांच्या सुरक्षेची ऐसी तैसी झालेली पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर हॉस्पिटलमध्ये एखादी आगीची घटना घडल्यास आवश्यक असलेल्या अग्निशमन यंत्रणेचीही व्यवस्था नाही. अनेक हॉस्पिटलमध्ये ही यंत्रणा असली तरी त्याची मुदत संपल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्य सरकार, महापालिका आणि रेल्वेच्या हॉस्पिटलांमध्ये रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

भाभा हॉस्पिटल, कुर्ला
काही वर्षांपूर्वी कुठलीही सुविधा नसलेल्या कुर्ला पश्चिमेकडील भाभा हॉस्पिटलचे एक वर्षांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरणानंतर भाभा हॉस्पिटलमधील रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हॉस्पिटलला एकच प्रवेशद्वार आहे. हॉस्पिटलमधील रुग्णवाहिका ये-जा करत असताना प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी होऊन रुग्णांना ताटकळत राहावे लागते. भविष्यात याठिकाणी दुर्घटना घडली तर, एका प्रवेशद्वारामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भाभा हॉस्पिटललगत असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेतून प्रवेशद्वार उभारल्यास रुग्णांना दिलासा मिळू शकतो. पोलीस वसाहतीमध्ये प्रवेशद्वार सुरू करण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून परवानगी घेणार असल्याचे भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कृष्णकांत पिंपळे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

- Advertisement -

अगरवाल हॉस्पिटल, मुलुंड
भांडुप-मुलुंडमधील नागरिकांसाठी महापालिकेचे मा.तु. अगरवाल हॉस्पिटल हे महत्त्वाचे आहे. वर्षभरापूर्वी हॉस्पिटलची जुनी इमारत धोकादायक घोषित करण्यात आली. इमारतीतील आंतररुग्णांना पालिकेच्या ‘टी’ वॉर्ड कार्यालयाच्या मागे नव्याने बांधलेल्या इमारतीत हलवण्यात आले. जुन्या इमारतीत सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरू असून, दररोज जवळपास ५०० रुग्ण उपचारासाठी येतात. हॉस्पिटलच्या नवीन इमारतीत कुठल्याही प्रकारची सुविधा नसून रुग्णांना विविध चाचण्या व तपासण्या खासगी लॅबमधून करून आणाव्या लागतात. शस्त्रक्रिया विभाग नसल्याने रुग्णांना सायन किंवा राजावाडी हॉस्पिटलला पाठवण्यात येते. इमारतीला दोन प्रवेशद्वार असून एकाच प्रवेशद्वाराचा सध्या वापर होतो.

रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये अग्निशमन नियम धाब्यावर
रेल्वेमधील कर्मचारी व अधिकार्‍यांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी मध्य रेल्वेतर्फे भायखळ्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. रेल्वे कर्मचारी व अधिकार्‍यांसाठी हे हॉस्पिटल असले तरी या हॉस्पिटलमध्ये अग्निशमन नियमाचे पालन होताना दिसत नाही. आग विझविण्यासाठी इतर सुविधांसह फायर इन्स्टिंग्युशर असणे आवश्यक आहे. मात्र या हॉस्पिटलमध्ये अनेक ठिकाणी सिलिंडरच नाहीत. तर असलेल्या सिलिंडरची आयुमर्यादा संपलेली आहे. हॉस्पिटलच्या एकाही इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवलेली नाही. हॉस्पिटलमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी काहीही उपाययोजना नाही. इमारतीमध्ये आगीसारखी दुर्घटना घडल्यास नागरिकांना सुरक्षितपणे हॉस्पिटलमधून बाहेर काढणे अशक्य होणार असून अजून किती दिवस दुर्लक्ष केले जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हॉस्पिटलच्या इमारतीचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रे बसवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ट अधिकार्‍याने दिली.

- Advertisement -

विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य सरकारी हॉस्पिटल, ठाणे
कामगार हॉस्पिटलमधील आगीच्या घटनेनंतर ठाण्यातील हॉस्पिटलमधील सुरक्षेचा प्रश्नही चव्हाट्यावर आला आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये पुरेशी अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे दिसून येते. विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य सरकारी हॉस्पिटलमध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, जव्हार, पालघर, कर्जत, कसारा आदी ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने येथे उपचारासाठी येतात. दररोज सुमारे हजार ते 1200 रुग्ण तपासणीसाठी येतात. हॉस्पिटलच्या ब्रिटिशकालीन इमारती पाडून तेथे सर्वसुविधांयुक्त हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. मात्र हॉस्पिटलमध्ये अग्निरोधक यंत्रणेची कमतरता दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा
ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये येतात. दररोज 1000 ते 1500 च्या आसपास रुग्ण येतात. हे हॉस्पिटल तीन मजली असून ५०० बेडची क्षमता आहे. काही महिन्यांपूर्वीच रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेचे नूतनीकरण केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

रुक्मिणीबाई हॉस्पिटल, कल्याण
कल्याणामध्ये रुक्मिणीबाई व डोंबिवलीत शास्त्रीनगर हे दोन हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलमध्ये आजुबाजूच्या ग्रामीण परिसरातील 1200 पेक्षा अधिक रुग्ण येतात. शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील यंत्रणेचे नुकतेच नूतीनकरण करण्यात आले असून रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जुनी यंत्रणा कार्यन्वित आहे. मात्र एखादी दुर्घटना घडल्यास ती यंत्रणा कुचकामी ठरण्याची शक्यता आहे. महापालिका दोन्ही हॉस्पिटलवर वर्षाला ३० कोटी खर्च करते. मात्र यामध्ये हॉस्पिटलमधील रुग्णांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते.

महापालिकेची प्रमुख रुग्णालये सुरक्षितच!
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे जेवढे पालन केले जाते, तेवढे काटेकोरपणे पालन उपनगरीय रुग्णालयांमध्ये केले जात नाही. महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर हॉस्पिटलमध्ये सीटीस्कॅन व डीएसए इत्यादी मोठ्या किमतीच्या यंत्रांमध्ये (मशिनरी) मनुष्य व उपकरणांच्या सुरक्षिततेसाठी तसेच रुग्ण सेवा अखंडित ठेवण्यासाठी अत्याधुनिक एरोसोल अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली आहे. केईएम, शीव रुग्णालय, नायर रुग्णालय, नायर दंत रुग्णालय, कुपर व ट्रामा इमारतींमधील आग लागण्यासंबंधातील उद्भवू शकणारे धोके लक्षात घेऊन त्वरित प्रतिसादाकरता रंगीत तालमी व कर्मचार्‍यांमध्ये जनजागृती केली जाते.

प्रभादेवी प्रसूति रुग्णालय…
महापालिकेच्या प्रभादेवी प्रसूति केंद्रामध्ये आगीपासून बचावासाठी कोणतीही व्यवस्था नाही. तीन मजली हॉस्पिटलमध्ये प्रत्येक मजल्यावर आगीपासून संरक्षण करण्यासाठी बसवलेले फायर इन्स्टिंग्युशरची मुदत संपलेली आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास ते निष्क्रिय ठरणार आहेत. 32 खाटांच्या प्रसूतिगृहात 60 ते 70 कर्मचारी काम करतात. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही ठोस सोय नसल्याने या ठिकाणी एखादी दुर्घटना झाल्यास मोठी हानी होऊ शकते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतिगृह, विक्रोळी
विक्रोळीमध्ये क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतिगृह ही दोन महत्त्वाची हॉस्पिटले आहेत. परंतु फुले हॉस्पिटल पाडून तेथे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याने फुले हॉस्पिटलमधील रुग्णांना आंबेडकर हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सर्वसाधारण हॉस्पिटल व प्रसूतिगृह अशी दोन्ही हॉस्पिटल आंबेडकर प्रसूतिगृहाच्या इमारतीमधूनच चालतात. विक्रोळी, पवई, कांजूरमार्ग, भांडुप येथील नागरिक मोठ्या प्रमाणात या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. त्यामुळे प्रचंड गर्दी असते. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात असला तरी हॉस्पिटलमध्ये एखादी आगीची घटना घडल्यास ती विझवण्यासाठी कोणतीही अग्निशमन यंत्रणा इमारतीमध्ये नाही. तीन मजली इमारतीमध्ये एकाही मजल्यावर फायर इन्स्टिंग्युशर नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जीव प्रशासनाकडून धोक्यात घालण्यात येत आहे.

सांताक्रूझच्या व्ही.एन देसाई या उपनगरीय हॉस्पिटलमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे ही गर्दी लक्षात घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये फायर इन्स्टिंग्युशर बसवले आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये फायर ऑडीटही केले आहे. ज्यामुळे आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा वापर होऊ शकतो.
– डॉ.राजश्री जाधव, वैद्यकीय अधिकारी, व्ही.एन देसाई हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -