Mumbai Power Cut: मुलुंडच्या ॲपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला आग; आणखी एकाचा मृत्यू

रूग्णालयाने १ लाख ७० हजार रूपये एवढं एक दिवसाचा बील कुटुंबाकडे दिल्याने आश्चर्य व्यक्त करत कुटुंबाने रूग्णालय प्रशासन विरोधात संताप व्यक्त केला आहे

सोमवारी मुंबईतील वीज यंत्रणा कोलमडली आणि नंतर सायंकाळी साडेसहा वाजता मुलुंडमधील ॲपेक्स रुग्णालयात जनरेटर खराब झाल्याने आग लागल्याचा प्रकार घडला. अचानक आग लागल्याने रुग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. मुलुंड पश्चिम येथील हे रूग्णालय कोरोना रूग्णांकरता असून यावेळी रुग्णालयात जवळपास ४० रुग्ण उपचार घेत होते. दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना अनेक खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने इतर रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान एका ८२ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला होता. तर फोर्टीस रूग्णालयात हलविण्यात आलेल्या दुसऱ्या रूग्णाचा सुद्धा मृत्यू झाला आहे.

कुटुंबाचा रूग्णालय प्रशासन विरोधात संताप

दरम्यान, ५५ वर्षीय विरेंद्र सिंग असे या मृत्यू झालेल्या रूग्णाचे नाव असून विरेंद्र सिंग यांना रात्री ऑक्सिजन अभावी फोर्टीसला हलविल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगितले. रात्री आग लागल्यानंतर रूग्णाला फोर्टीस रूग्णालयात हलवल्याने रूग्णालयाने १ लाख ७० हजार रूपये एवढं एक दिवसाचा बील कुटुंबाकडे दिल्याने आश्चर्य व्यक्त करत कुटुंबाने रूग्णालय प्रशासन विरोधात संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयाच्या जनरेटरला आग लागून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून आग लागल्यानंतर आपल्या कुटुंबियांना शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव झाली. यापैकीच एक ५५ वर्षांच्या विरेंद्र सिंग यांचे कुटुंबीय देखील होते. विरेंद्र सिंग यांचा या प्रकरणात दुर्देवी मृत्यू झाला. पण, ते कुठल्या रुग्णालयात आहेत हे शोधण्यासाठी कुटुंबियांना पाच तास लागले असल्याची माहिती मिळतेय.

रुग्णालयाचा खर्च कोण उचलणार, कुटुंबाचा प्रश्न

रुग्णालय दुर्घटनेमध्ये दुर्देवी मृत्यू झालेल्या आपल्या वडीलांवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करता यावेत यासाठी त्यांचा मुलगा सुरज सिंग सकाळपासून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वणवण फिरत होता. पण, मृत्यू होऊन नऊ तास उलटून गेले तरी देखील अद्यापही त्यांना त्यांच्या वडिलांचा मृतदेह ताब्यात मिळाला नव्हता. विरेंद्र सिंग यांना मृत घोषित केले आणि १ लाख ७० हजारांचे बिल विरेंद्र यांचा मुलगा सुरज सिंग याला देण्यात आले. यानंतर रुग्णालयाचा खर्च कोण उचलणार यासाठी फोर्टिस आणि अपेक्स रुग्णालयातील व्यवस्थापनाशी चर्चा सुरू झाली आणि त्याला दुपार उलटून गेली. तोपर्यंत सिंग यांच्या कुटुंबियांना त्यांचा मृतदेह सोपविण्यात आला नाही. बिल भरायचे तरी कसा, असा प्रश्न त्यांच्या समोरही उभा उभा आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे, असे सिंगच्या कुटुंबाने सांगितले.


Mumbai Power Cut: जनरेटर अति उष्ण झाल्याने रुग्णालयाला आग; ४० रूग्णांचे दुसरीकडे स्थलांतर