वडाळा पूर्व दुमजली इमारतीत आग; आगीत ५ जण जखमी

वडाळा येथे गणेश नगर अष्टविनायक या दुमजली इमारतीला आज आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत ५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai
Fire
आग

वडाळा पूर्व येथील गणेश नगर अष्टविनायक दुमजली इमारतीत दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली आहे. या आगीत एकूण ५ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या आगीत जखमी झालेल्या लोकांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच, या आगीत तिघे जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश असून त्यांच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दिड वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर

आगीच्या भडक्यात दिड वर्षांचा अंश अलंकार हा मुलगा शंभर टक्के भाजला असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे हॉस्पिटलकडून दिलेल्या माहितीत स्पष्ट झाले आहे. या मुलाला बर्न वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. २ वर्षांची स्वरा चिकाटे या घटनेत २५ टक्के भाजली असून तिची प्रकृती स्थिर आहे. तर, ३६ वर्षीय जागृती चिकाटे या जखमी झाल्या असून त्या ४५ टक्के भाजल्या आहेत. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्यामुळे इथल्या लोकांची धावपळ झाली.

या इमारतीवरुन गेलेल्या टाटा पॉवरच्या विद्युतवाहिनीत स्पार्क झाला. स्पार्कचा झटका तीव्र असल्याने पहिल्या मजल्यावरील ३५३ घरातील विद्युतवाहिन्या जळाल्या. या घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले असून यात तीन लहान मुले आणि दोन व्यक्तींचा समावेश आहे. त्याच ठिकाणी या आगीत मृत मांजर देखील सापडले आहे. या घटनेविषयी टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांशी सध्या बोलणे सुरू आहे.


हेही वाचा – शनिवारपर्यंत घरातला सेटटॉप बॉक्स चालूच ठेवा; नाहीतर बंद पडेल!